Pimpri News : कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेण्यासाठी पैसे घेणाऱ्यांची पोलिसात तक्रार करा – सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे

0

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांनी एक लाख रुपये घेतल्याचा प्रकार चिंचवड येथे उघडकीस आला आहे. महापालिकेच्या कोविड रुग्णालयात रुग्णांना विनाशुल्क दाखल केले जात असताना लाख रुपये खुद्द डॉक्टरांनी उकळल्याने या प्रकरणी सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

या आणि अशा प्रकारात कठोर कारवाई करण्याचे पोलिसांनी ठणकावले आहे. जर महापालिकेच्या कोविड रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी रुग्ण अथवा नातेवाईकांकडून पैसे घेतले असतील तर संबंधितांनी थेट माझ्याशी संपर्क करावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांनी केले आहे.

कोरोना बाधित रुग्णांवर वेळेत आणि चांगले उपचार व्हावेत, यासाठी प्रशासन विविध स्तरावर प्रयत्न करीत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कोविड रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही. असे असतानाही केवळ आर्थिक हव्यासापोटी तीन डॉक्टरांनी मिळून एका महिला रुग्णाकडून तब्बल एक लाख रुपये घेतले.

_MPC_DIR_MPU_II

त्यानंतर संबंधित महिलेचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी या प्रकरणाला वाचा फोडली असून सुरुवातीला ना, नाही करणाऱ्या महापालिका प्रशासनाने याबाबत रविवारी (दि. 2) गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी देखील तत्परता दाखवत तिन्ही डॉक्टरांना तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.

पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे म्हणाले, “महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी एक लाख रुपये घेतल्याबाबत महापालिकेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात तीन डॉक्टरांना अटकही करण्यात आली आहे. हा एक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे असे आणखी प्रकार घडल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी ज्यांच्या बाबतीत असा अनुभव आला असेल त्यांनी पुढे येऊन तक्रार करावी.

“कोरोनाबधित रुग्णाला महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेण्यासाठी ज्या रुग्णांना अथवा रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांनी पैसे मागितले असतील आणि नागरिकांनी ते पैसे दिले असतील हा फसवणुकीचा प्रकार आहे. अशा नागरिकांनी पुढे येऊन थेट माझ्याशी (सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे – 9730200383) संपर्क करावा. तक्रारदारांची मागणी असेल तर त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही सहाय्यक आयुक्त डॉ. कवडे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment