Pimpri news: जादा रकमेची मागणी करणाऱ्या नागरी सुविधा केंद्रांविरोधात तक्रार करा; पालिकेचे आवाहन

  प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना अंतर्गत नागरी सुविधा केंद्रामार्फत अर्ज भरून घेण्यात येत आहेत. त्याकामी जास्तीत जास्त 50 रुपये आकारण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना पालिकेच्या विविध सेवा सुविधा विहित कालावधीमध्ये जवळच्या ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने नागरी सुविधा केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रामध्ये नागरिकांना विविध दाखल्यांच्या अर्ज स्विकृतीची सोय केली आहे. केंद्र चालकांनी अर्ज भरताना ठरवून दिल्याप्रमाणेच पैशाची आकारणी करावी. जादा रक्कमेची मागणी केल्यास संबंधित केंद्रविरोधात पालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रात लेखी तक्रार करावी, असे आवाहन मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार यांनी केले.

पालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना पालिकेच्या विविध सेवा सुविधा विहित कालावधीमध्ये जवळच्या ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी नागरी सुविधा केंद्र कार्यरत आहेत. केंद्रामध्ये नागरिकांना विविध दाखल्यांचे अर्ज स्वीकारण्याची सोय केली आहे.

सद्यस्थितीत केंद्रशासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना तसेच प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत अर्ज सादर केलेल्या अर्जदारांचे डीमांड ड्राफ्ट व त्या अनुषंगीक कागदपत्रांची स्विकृती नागरी सुविधा केंद्रामध्ये करण्यात येत आहे.

प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना अंतर्गत नागरी सुविधा केंद्रामार्फत अर्ज भरून घेण्यात येत आहेत. त्याकामी जास्तीत जास्त 50 रुपये आकारण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जमा होणाऱ्या डिमांड ड्राफ्ट व त्या अनुषंगिक कागदपत्रांसाठी नागरिकांनी 5 हजार रुपये डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त कोणतीही ज्यादा रक्कम कोणत्याही नागरी सुविधा केंद्र चालकास देऊ नये तसेच केंद्रचालकाने नागरिकांकडून डी. डी. व्यतिरिक्त इतर कोणत्याही रक्कमेची मागणी करू नये.

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत या पुर्वी अर्ज केलेल्या नागरिकांनी डिमांड ड्राफ्ट नागरी सुविधा केंद्रामध्ये जमा करावयाचा आहे.

तथापि, या योजनेसाठी नव्याने अर्ज सादर करित असलेले नागरीक संबंधित अर्ज कोणत्याही ठिकाणी, सायबर कॅफे अथवा इतर ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतात.

यासाठी नागरी सुविधा केंद्रामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. मात्र अर्ज भरल्यानंतर डीमांड ड्राफ्ट व त्या अनुषंगिक कागदपत्रे नागरी सुविधा केंद्रामध्ये जमा करावयाची आहेत.

पालिकेच्या इतर सेवांसाठी पुर्वी प्रमाणेच प्रती अर्ज 20 रुपये नागरी सुविधा केंद्रचालकांना आकारण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही केंद्र चालकाने जादा रकमेची मागणी केल्यास लेखी तक्रार करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.