Pimpri news: खासगी रुग्णालये जादा बिल आकारत असल्याच्या तक्रारी; महापालिका करणार बिलांचे लेखापरिक्षण

क्षेत्रीय कार्यालयनिहाय आठ जणांच्या पथकाची स्थापना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालये रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना बाधित रुग्णांकडून जास्त बिल आकारणी करत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची वैद्यकीय बिले वाजवीपेक्षा अधिक असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.  त्यामुळे रुग्णसेवा, त्यापोटी आकारले जाणारे शुल्क आणि प्रक्रिया, खाटांची संख्या आणि उपलब्धता, रुग्णांचा दैनंदिन डिस्चार्ज अहवाल तसेच इतर प्रशाकीय कामकाज आणि वैद्यकीय बीलांचे अंतिम लेखापरिक्षण करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय आठ जणांच्या पथकाची स्थापना केली आहे.

यासाठी नियंत्रण प्रमुख म्हणून मुख्य लेखापरीक्षक आमोद कुंभोजकर यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचा आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढला आहे.

महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिका स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. महापालिकेने शंभरहून अधिक खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून परवानगी दिली आहे.

कोरोना रुग्णांवरील उपचाराकरिता समर्पित केलेले हेल्थ केअर सेंटर आणि खासगी हॉस्पीटल या अधिग्रहीत केलेल्या रुग्णांलयांमार्फत अवास्तव आकारल्या जाणा-या बीलांचे लेखापरिक्षण आणि बीलांसंदर्भात येणा-या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र ऑडीट यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे.

खासगी रुग्णांलयांमार्फत अवास्तव आकारल्या जाणा-या बीलांवर नियंत्रण ठेवणे, वैद्यकीय देयकांचे पूर्व, अंतिम लेखापरीक्षण करण्यासाठी महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रातील रुग्णालयांची संख्या विचारात घेवून क्षेत्रीय कार्यालयस्तरावर आठ जणांच्या पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

जेष्ठ वैद्यकीय अधिकारी, लेखाधिकारी, लेखापाल, उपलेखापाल, मुख्य लिपिक, लिपिक, कनिष्ठ अभियंता  नियुक्ती करण्यात आलेली आहे. लेखाधिकारी किशोर शिंगे, पद्माकर कानिटकर,  तांत्रिक बाबींसाठी उपअभियंता  दिपक पाटील आणि संजय काशिद यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहेत. समन्वय अधिकारी यांनी कामाचा अहवाल मुख्य लेखापरिक्षक तसेच नियंत्रण प्रमुख आमोद कुंभोजकर यांना द्यावा लागणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

‘हे’ कामकाज करावे लागणार !

महापालिका क्षेत्रातील खासगी हॉस्पिटलमध्ये शासकीय दरानुसार बिल आकारले जाईल याबाबत पूर्व पडताळणी करणे. हॉस्पिटलचे प्रथम ड्राफ्टबिल दिल्यानंतर त्याची तपासणी सोबत रुग्णालय निहाय नियुक्त केलेल्या ऑडिट पथकामार्फत ऑडीट केल्यानंतर रुग्णाला अंतिम बिल देण्याबाबत रुग्णालयांना सुचना देणे. खासगी रुग्णालयामार्फत आकारल्या जाणा-या सर्व देयकांचे नियुक्त केलेल्या पथकामार्फत लेखापरिक्षण करणे.

बिलांमध्ये त्रुटी आढळल्यास त्याचे जागीच निराकरण करणे. अशा  बिलांचे ऑडीट करताना आक्षेप उपस्थित करुन प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत. भविष्यात वैद्यकीय विभागाकडून नव्याने काही खासगी रुग्णालये अधिग्रहित केल्यास अशा रुग्णालयाचे कामकाज त्या-त्या क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील पथकाने पहावयाचे आहे.

हे कामकाज पाहण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचा-यांपैकी एखादा कर्मचारी अनुपस्थित राहिल्यास अशा कर्मचा-यांच्या जागी तो कर्मचारी ज्या विभागातील असेल. त्या विभागप्रमुखांनी पर्यायी कर्मचा-याची त्या ठिकाणी नियुक्ती करावयाची आहे. तसे प्रशासन विभागास कळवावे. कामकाज पाहण्यासाठी ज्या कर्मचा-यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. त्या कामकाजासह सोपविण्यात आलेले कामकाज संबंधित अभियंत्यांनी करावयाचे आहे.

अधिकारी आणि कर्मचा-यांनी त्यांच्या विभागाचे कामकाज सांभाळून हे कामकाज पुढील आदेश येईपर्यंत करावयाचे आहे. हा आदेश रद्द करण्याकामी दबावतंत्राचा वापर करणे, हेतुपरस्पर कर्तव्यावर अनुपस्थित राहणे, आदेश न स्विकारणे अथवा आदेशाची अवज्ञा करणे असे गैरवर्तणूकीचे कृत्य केल्यास, त्या अधिकारी आणि कर्मचा-यांवर आपत्ती व्यवस्थापन नियमाअंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा  आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.