Pimpri News : रस्ते, गटर साफसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण करा; संदीप वाघेरे

महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

एमपीसीन्यूज : शहरातील रस्ते व गटर्स साफसफाई करण्याची निविदा प्रक्रिया   प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

याबाबत वाघेरे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदफन दिले आहे. वाघेरे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील रस्ते व गटारांची साफसफाई करण्याकरिता आरोग्य विभागामार्फत निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. या निविदेचे पहिले पाकीट 9 डिसेंबर2020 रोजी उघडण्यात आले. परंतु, अद्यापही दुसरे पाकीट उघडण्यात आलेले नाही.

या निविदेबाबत अनेक विभागाकडे अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. आरोग्य विभागाकडून या तक्रारींच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तथापि, या तक्रारींवर निर्णय घेण्याएवजी निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. निविदेबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने व निविदेचे पाकीट उघडण्यास विलंब झाल्याने निविदा रद्द करण्यात येणार असल्याचे समजते.

शहरामधील रस्त्यांची व गटारांची साफसफाई करण्याचे कामकाज हे नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असल्याने निविदा प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. सदर निविदेचा कालावधी हा तीन वर्षाचा असून त्या निविदेचा अंदाजे खर्च 100 कोटीपेक्षा अधिक असल्याने केवळ तक्रारीप्राप्त झाल्याच्या कारणासाठी व निविदा प्रक्रियेला विलंब झाल्याच्या कारणामुळे पूर्ण निविदा प्रक्रियाच रद्द करणे योग्य वाटत नाही.

मनपा प्रशासनामार्फत संबंधित तक्रारींचे निरसन करून तसेच आवश्यक त्या बाबींची शहानिशा करून निविदा प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच निविदा प्रक्रिया राबविण्यास विलंब  झाल्याने निविदा प्रक्रिया रद्द करण्याची कोणतीही तरतूद कायद्यामध्ये नाही.

त्यामुळे शहरातील रस्ते व गटर्स साफसफाई कामकाजाची निविदा रद्द न करता मुख्य लेखापरीक्षक यांच्याकडून नस्ती तपासून प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी संदीप वाघेरे यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.