Pimpri News: काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांचा राजीनामा

विधानपरिषदेला नाकारल्याने राजीनामा?

एमपीसी न्यूज – गलितगात्र झालेल्या काँग्रेसमध्ये दिल्लीपासून गल्लीपर्यंत पडझड सुरु आहे. पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी आज (बुधवारी) पदाचा अचानक तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

दरम्यान, विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी नाकारल्याच्या नाराजीतून त्यांनी राजीनामा दिला असल्याचे बोलले जाते. पण, आपण वैयक्तिक कारणास्तव या जबाबदारीतून मुक्त होत असल्याचे साठे यांनी सांगितले आहे.

साठे मागील सहा वर्षांपासून शहर काँग्रेसचे नेतृत्व करत होते. पडत्या काळात त्यांच्याकडे पक्षाची धुरा आली होती. त्यांनी विविध आंदोलने करुन शहरात पक्ष जिवंत ठेवला. परंतु, त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या 2017 च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला. काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आला नाही.

आता राज्यातील सत्तेत काँग्रेस पक्ष सहभागी आहे. त्यामुळे शहारात संघटन वाढविण्यासाठी विधानपरिषदेच्या आमदारकीची संधी मिळावी अशी साठे यांची इच्छा होती. परंतु, पक्षाने दुर्लक्ष करत डावलले आहे. त्या नाराजीतूनच त्यांनी राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यापूर्वी देखील साठे यांनी राजीनामा दिला होता. परंतु, त्यावेळी पक्षश्रेष्टींच्या मनधरणीनंतर साठे यांनी राजीनामा मागे घेतला होता.

विधानपरिषदेची उमेदवारी निश्चितपणे मागितली होती!
राजीनाम्यानंतर बोलताना साठे म्हणाले, गेल्या 24 वर्षांपासून पक्षाचे काम करत आहे. विद्यार्थी, युवक संघटनेपासून काम करत आहे. सहा वर्षांपासून शहराध्यक्ष म्हणून काम करत होतो. तन, मन धनाने पक्षाचे काम केले. वैयक्तिक कारणास्तव या जबाबदारीतून मुक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

यापुढे देखील पक्षाचे काम निष्ठेने करणार आहे. मी विधानपरिषदेची उमेदवारी निश्चितपणे मागितली होती. पण संधी नाही मिळाली. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना राजीनामा पाठविला आहे. त्यांना राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली आहे. मी राजीनाम्यावर ठाम राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.