Pimpri news: भाजप उपाध्यक्ष समीर जावळकर यांच्या मागणीची दखल; प्लाझ्मा दात्याला मिळणार दोन हजार रुपये

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या गंभीर रुग्णाला प्लाझ्मा वरदान ठरत असून प्लाझ्मा दात्यांना अर्थसहाय्य देण्याच्या भाजपचे शहर उपाध्यक्ष समीर जावळकर यांच्या मागणीची महापालिका प्रशासनाने दखल घेतली आहे. महापालिका प्रशासनाने प्लाझ्मा दात्यांना दोन हजारांची प्रोत्साहनात्मक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्लाझ्मा दान करणाऱ्यांची संख्या वाढेल, मृत्यूचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास जावळकर यांनी व्यक्त केला.

कोरोनामुळे रोज अनेक नागरिकांचे मृत्यू होत आहेत. प्लाझ्मा न मिळाल्यानेही काही जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जणांची प्लाझ्मा दान करण्याची इच्छा असूनही भीती व गैरसमजामुळे घाबरून प्लाझ्मा दान करत नाहीत. त्यामुळे महापालिकेने गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करावी. प्लाझ्मा दात्याला अर्थसहाय्य करावे अशी मागणी भाजपचे शहर उपाध्यक्ष समीर जावळकर यांनी 17 मार्च रोजी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेवून केली होती.

_MPC_DIR_MPU_II

त्यानंतर त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीची दखल घेत महापालिका प्रशासनाने प्लाझ्मा दात्यांना दोन हजारांची प्रोत्साहनात्मक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

समीर जावळकर म्हणाले, “कोरोनाच्या गंभीर रुग्णाला प्लाझ्मा वरदान ठरत आहे. रुग्णांना प्लाझ्मा थेरपी फायदेशीर ठरत आहे. अशा परिस्थितीत गंभीर रुग्णांवर उपचारांसाठी ‘प्लाझ्मा थेरपी’कडे एक आशेचा किरण म्हणून पाहिले जात आहे. प्लाझ्मा किंवा प्लाझ्मा थेरपीसाठी दाता हवा आहे असे असंख्य फोन आणि मेसेज येत होते.

कोरोनातून बरे झाल्यानंतर 28 दिवसांनी प्लाझ्मा दान करता येतो. पण, प्लाझ्मादानाबाबत नागरिकांमध्ये गैरसमज होते. ते दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्लाझ्मा दान करणाऱ्या व्यक्तींना अर्थसहाय्य देण्याची मी मागणी केली होती. प्रशासनाने त्याची दखल घेत दात्याला दोन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाचा मी आभारी आहे. यामुळे प्लाझ्मा दान करणाऱ्यांची संख्या वाढेल. नागरिकांचे प्राण वाचतील.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.