Pimpri news: पालिका कर्मचाऱ्यांसाठी ‘धन्वंतरी स्वास्थ’ योजना चालू ठेवा; स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांसाठी लाभदायक ठरत असलेली ‘धन्वंतरी स्वास्थ’ योजना चालू ठेवावी की बंद करावी, यावरून औद्योगिक न्यायालयात सुनावणी सुरू असताना ही योजना चालू ठेवण्यात यावी, असा प्रस्ताव स्थायी समिती सभेत आज (बुधवारी) मंजूर करण्यात आला आहे. शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी आयत्यावेळी मांडलेल्या प्रस्तावाला भाजपचे शीतल शिंदे यांनी अनुमोदन दिले.

महापालिका सेवेतील, सेवानिवृत्त कर्मचा-यांसाठी ‘धन्वंतरी स्वास्थ’ ही वैद्यकीय योजना 1 सप्टेंबर 2015 पासून लागू करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून ही योजना बंद करण्याचा घाट घातला जात होता.

त्याऐवजी विमा पॉलिसी आणण्याचे प्रयत्न झाले. त्याला महासंघाने तीव्र विरोध केला आहे. असे असताना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अचानक 14 सप्टेंबर 2020 पासून रात्री 12 नंतर ही योजना स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.

त्याविरोधात कर्मचारी महासंघाने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने अगोदर 15 सप्टेंबर पर्यंत ‘जैसे थे’चा आदेश दिला होता. काल पुन्हा 24 सप्टेंबर पर्यंत ‘जैसे थे’चा आदेश दिला आहे.

यामुळे पालिका प्रशासनाने ‘धन्वंतरी स्वास्थ’ योजनेला 24 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही योजना कायम ठेवण्यासाठी भाजपच्या एका गटाचा तीव्र विरोध आहे. त्यांचा विमा पॉलिसीसाठी आग्रही आहे.

आज स्थायी समितीच्या सभेत ‘धन्वंतरी स्वास्थ’ योजने चालू ठेवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

महापालिका सेवेतील कर्मचारी, अधिकारी, सेवानिवृत्त कर्मचा-यांसाठी ‘धन्वंतरी स्वास्थ’ ही वैद्यकीय योजना चालू ठेवण्याचा आयत्यावेळचा प्रस्ताव शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी मांडला. भाजपच्या शीतल शिंदे यांनी अनुमोदन दिले.

कर्मचाऱ्यांना विमा पॉलिसी नकोय, त्यांना धन्वंतरी स्वास्थ’ योजना पाहिजे. कोरोना काळात कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार करून आयुक्तांनी तत्काळ योजनेची अंमलबजावणी करावी, असे कलाटे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.