Pimpri News: ‘ठेकेदारीचा भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे’, ‘आऊटसोर्सिंग’विरोधात महापालिकेसमोर आंदोलन

एमपीसी न्यूज – “ठेकेदारी हटवा, महापालिका वाचवा”, “नही चलेगी नही चलेगी, ठेकेदारी नही चलेगी”, “ठेकेदारीचा भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे”, “ठेकेदारी हटाव, कोरोना योद्धे बचाव” असे फलक हातामध्ये घेत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मानधनावरील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या खासगीकरणाविरोधात आज (मंगळवारी) आंदोलन केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध रुग्णालयांत खासगी एजन्सीमार्फत मनुष्यबळ पुरविण्यास सत्ताधारी भाजपने मंजुरी दिली आहे. महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयासह इतर नऊ रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून स्टाफनर्स, पॅरामेडीकल स्टाफसह इतर कर्मचाऱ्यांची आऊटसोसिंगद्वारे नेमणूक केली जाणार आहे. या रूग्णालयांमध्ये मनुष्यबळ पुरविण्यासाठी तीन ठेकेदारांची दोन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या खासगीकरणाला मानधनावरील कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध आहे.


कोविड योद्धा बचाव कृती समितीने याविरोधात महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. कोविड योद्धाना न्याय मिळावा, मानधन तत्त्वावर कायम ठेवावे, समान काम समान वेतन द्यावे, आम्हाला ठेकेदारीमध्ये टाकू नका, 11 महिने करार पद्धतीने कामावर ठेवा, कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा मिळाव्यात अशा मागण्या मानधनावरील कर्मचाऱ्यांनी केल्या. मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्यांचे मत जाणून घेतले. आयुक्त राजेश पाटील यांच्यासोबत बैठक घेतली जाईल असे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.