Pimpri news: बोगस ‘एफडीआर’ देणाऱ्या ठेकेदारांवर पालिकेने कारवाई करावी – आण्णा बनसोडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने मागील तीन वर्षात राबविलेल्या निविदांवर 11 % पेक्षा कमी दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदारांनी पीसडी म्हणून दिलेले एफडीआर तपासण्याची सूचना आमदार अण्णा बनसोडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे. तसेच बोगस ‘एफडीआर’ देणाऱ्या ठेकेदारांवर पालिकेने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आमदार बनसोडे यांनी म्हटले आहे की, 11 % पेक्षा कमी दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदारांनी PSD (पर्फोर्मंस सेक्युरीटी डिपॉझिट) म्हणून मनपास दिलेले अनेक FDR (फिक्स डिपॉझिट रिसीट ) खोटे की खरे याबाबतची खात्री मनपाकडे नाही.

खोटे व बोगस FDR बनवून देणारी टोळी शहरात कार्यरत असून असे अनेक बोगस FDR ठेकेदारांनी महापालिकेस दिलेले आहेत.

या प्रकरणात मोठे रॅकेट असून ठेकेदार व अधिकारी यांचे संगनमत असल्याने या प्रकरणाची वाच्यता झाली नाही. महापालिका ठेकेदार काम मिळविण्यासाठी कमी दराने निविदा भरतात. हजारो कामासाठी मनपा टेंडर मागवीत असते. या कामासाठी निविदांमध्ये स्पर्धा होऊन 20, 25, 30, 32 टक्के कमी दराने निविदा ठेकेदार भरतात व काम मिळवतात.

काम मिळाल्यानंतर PSD (पर्फोर्मंस सेक्युरीटी डिपॉझिट) म्हणून मनपास FDR (फिक्स डिपॉझिट रिसीट ) देणे बंधनकारक असल्याने मोठया रक्कमा बँकेकडे ठेऊन ठेव पावती अथवा डीडी स्वरूपात FDR मनपाकडे जमा करावा लागतो. जमा केलेला FDR खोटा की खरा याची खात्री अथवा तपासणी मनपा करीत नाही.

नेमका याचाच फायदा घेऊन बनावट FDR तयार करून देणारी टोळी सक्रीय झाली आहे. ठेकेदार असे बनावट FDR मनपाकडे जमा करीत असल्याने या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषी ठेकेदारांवर मनपाची फसवणूक केली म्हणून गुन्हे दाखल करावेत. त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी बनसोडे यांनी केली आहे.

या प्रकरणात करोडो रुपयांचा घोटाळा असल्याची बाब चौकशी नंतर उघडकीस येईल, असा दावाही आमदार बनसोडे यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.