Pimpri News: बोगस एफडीआर प्रकरणी उद्यापर्यंत ठेकेदारांवर गुन्हे दाखल होणार – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज – बोगस एफडीआर (फिक्स्ड डिपॉझिट रिसीट) आणि बँक हमी देवून कंत्राट घेणा-या 18 ठेकेदारांवर कारवाई अटळ आहे. फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेची आजच माहिती घेतली. सबळ कागदपत्रे गोळा करणे शिल्लक होते. ती गोळा झाली आहेत. आज रात्री किंवा उद्या (शनिवार) पर्यंत ठेकेदारांवर गुन्हे दाखल होतील, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (शुकवारी) पत्रकारांशी बोलताना ठणकावून सांगितले.

विकास कामांचे कंत्राट मिळविताना फिक्स्ड डिपॉझिट रिसीट (एफडीआर) आणि बँक हमी देणे बंधनकारक असताना 18 ठेकेदारांनी 107 कंत्राटांमध्ये बोगस एफडीआर आणि बँक हमी दिल्याची माहिती समोर आली.

या 18 ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले आहे. त्यांना पिंपरी महापालिकेची निविदा भरण्यास तीन वर्ष प्रतिबंध करण्यात आला आहे. पण, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देवूनही गुन्हे दाखल होत नाहीत. गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे.

याबाबत विचारले असता आयुक्त हर्डीकर म्हणाले, बोगस एफडीआर प्रकरणी 18 ठेकेदारांना काळ्यात यादीत टाकले आहे. त्यांच्यावर फौजदारी कारवाई निश्चित आहे. सबळ कागदपत्रे गोळा करण्यात आली आहेत. आज शुक्रवारी रात्री अथवा उद्या शनिवारपर्यंत गुन्हे दाखल केले जातील. महापालिकेचे अधिकारी दोषी आढळल्यावर त्यांच्यावर प्रशासकीय स्वरुपाची कारवाई करण्यात येईल.

‘हे’ ठेकेदार आहेत काळ्या यादीत !

श्री दत्त कृपा एंटरप्रायजेस, सोपान जनार्दन घोडके, दीप एंटरप्रायजेस, बीके खोसे, बीके कन्सट्रक्शन ॲण्ड इंजिनिअरिंग, एचए भोसले, भैरवनाथ कन्सट्रक्शन, कृती कन्सट्रक्शन, डीजे एंटरप्रायजेस, म्हाळसा कन्सट्रक्शन प्रा. लि, अतुल आरएमसी, पाटील ॲण्ड असोसिएट, डीडी कन्सट्रक्शन, एसबी सवाई, चैतन्य एंटरप्रायजेस, वैदही कन्सट्रक्शन, त्रिमुती कन्सट्रक्शन आणि राधिका कन्सट्रक्शन या 18 ठेकेदारांना काळ्यात यादीत टाकले आहे.

त्यांना तीन वर्ष पालिकेच्या निविदा भरण्यास प्रतिबंध केले आहे. त्यांच्यावर दोन दिवसांत फौजदारी कारवाई होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.