Pimpri News : शहरातून ऑलिंम्पिक विजेते खेळाडू घडविण्यासाठी योगदान द्यावे : उत्तम केंदळे

क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ आणि संघटनांना आवाहन

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणारे क्रीडा धोरण शहराला स्मार्ट क्रीडा नगरी बनविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ आणि संघटनांनी   मिशन ऑलिम्पिक 2028 चे ध्येय समोर ठेवून सांघिक  प्रयत्नांतून या शहरातून ऑलिंम्पिक विजेते खेळाडू घडविण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्रीडा धोरणानुसार राबविण्यात येणारे क्रीडा उपक्रम आणि स्पर्धा यांचे नियोजन करण्यासाठी  पिंपरी चिंचवड शहरातील विविध क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधीसमवेत महापालिका क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सदस्यांची विचार विनिमय बैठक सभापती केंदळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी केंदळे बोलत होते.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या या बैठकीस तुषार हिंगे, शैलेश मोरे, अपर्णा डोके, रेखा दर्शले, डब्बू आसवाणी, अश्विनी जाधव, क्रीडा विभागाचे उप आयुक्त संदीप खोत , क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, क्रीडा पर्यवेक्षक तसेच पिंपरी चिंचवड विविध क्रीडा संघटना ,पुणे जिल्हा क्रीडा संघटनांचे पदाधिकारी ,सदस्य तसेच पिंपरी चिंचवड माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षक महामंडळाचे पदाधिकारी  आणि सदस्य उपस्थित होते.

बैठकीमध्ये फिरोज शेख, महादेव फपाळ, चंद्रशेखर कुदळे, सुजाता चव्हाण, ज्ञानेश्वरी लोखंडे, किर्ती मोटे, निवृत्ती काळभोर, रवी भंडारे, निलेश कोल्हे, उमा काळे, सिद्धार्थ खाणवे, विनायक पदमने, केतन वाईकर  आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

बैठकीत महापालिकेच्या क्रीडा धोरणाबद्दल सर्वंकष चर्चा झाली. धोरणात काही सुधारणा करण्याबाबत उपस्थित प्रतिनिधींनी सूचना केल्या.

क्रीडा विभागाकडे सर्व क्रीडा संघटनांची अद्यावत माहिती संकलीत असली पाहिजे.  नविन तंत्रज्ञानानुसार क्रीडा साहित्य खरेदी  केले पाहिजे. मैदाने खेळासाठी स्वतंत्रपणे मैदान विकसित केले पाहिजे. वेट लिफ्टिंग, व्हॉली बॉल, धनुर्विद्या, मॅरेथॉन, फुटबॉल,  हँड बॉल, खो खो, बॉक्सिंग या सारख्या क्रीडा प्रकारासाठी स्वतंत्र जागा अथवा मैदान असावे.  इंद्रायणी नगर क्रीडा संकुल,भोसरी येथे विद्यार्थी व पालक यांना बसण्यासाठी कायम स्वरूपी बसण्यासाठी गॅलरी व्यवस्था करावी, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

तसेच  अथेलेटिक ट्रॅकवर आठवड्यातून एक वेळा पाणी मारावे, महापालिकेच्या खेळाडू दत्तक योजनेत फेडरेशन मार्फत खेळल्या जाणा-या खेळाडूंचा समावेश करण्यात यावा.  क्रीडा धोरणात स्पोर्ट्स मेडिसिन सेंटरचा समावेश करावा.  कै.आण्णासाहेब मगर स्टेडीयम,नेहरुनगर येथे वेटलिफ्टिंग सेंटर असून वेट लिफ्टिंग सेंटर साठी अद्यावत साहित्यासह पुरेशी जागा उपलब्ध करून  द्यावी. कै.आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथील क्लायम्बिंग वॉल नव्याने बांधण्यात यावी. गतवर्षी प्रमाणे पुढील आर्थिक वर्षात शालेय विद्यार्थ्यांच्या, महापौर चषक विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात. राज्य ,राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळविले आहे अशा खेळाडूंचा महापालिकेकडून सत्कार करावा.

खेळाडू विमा योजना सुरु करावी. महापालिकेच्या वतीने दरवर्षी 29  ऑगष्ट रोजी क्रीडा दिन साजरा करावा.  क्रीडा प्रशिक्षण शिबीर आयोजित करावे.  म.न.पा.परिसरात पुढील वर्षी वेट लिफ्टिंग ,व्हॉली बॉल ,धनुर्विद्या ,मॅरेथॉन ,फुटबॉल, हँड बॉल, खो खो, बॉक्सिंग या खेळांच्या महापौर चषक स्पर्धा आयोजित कराव्यात आदी सूचना बैठकीत करण्यात आल्या.

क्रीडा संघटनांनी केलेल्या सूचना आणि मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून निर्णय घेण्यात येईल, असे उत्तम केंदळे यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड महापालिका अकादमी तयार करण्याचा विचार असून त्या माध्यमातून खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. महापालिका स्तरावर खेलरत्न पुरस्कारसाऱखा क्रीडा पुरस्कार देण्याचा विचार सुरु असून त्याबाबत काही सूचना असल्यास त्या महापालिकेला कळवाव्यात, असे आवाहनही  सभापती केंदळे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.