Pimpri news: ऑक्सिजनचा काळाबाजार रोखण्यासाठी कंपन्यांवर नियंत्रण ठेवा – तुषार कामठे

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालल्याने रुग्णांना आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे ऑक्सिजनच्या बाबतीत काळाबाजार होऊ शकतो. त्यासाठी ऑक्सिजन तयार करणाऱ्या कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे.

याबाबत पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेवक कामठे यांनी म्हटले आहे की, पुणे शहर व जिल्ह्यात दिवसेंदिवस रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होत आहे. अनेकांनी इंजेक्शनचा साठा निर्माण केल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. चढ्या दराने इंजेक्शनची विक्री केली जात आहे.

आपत्कालीन वेळी रुग्णाच्या नातेवाईकांची आर्थिक फसवणूक होत आहे. हे इंजेक्शन मिळवण्यासाठी नागरिकांना तासनतास रांगेत थांबावे लागत आहे. त्यातच रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णांनामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. ऑक्सिजनची देखील अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते.

रुग्णांना आवश्यक असलेल्या ऑक्सिजनच्या मागणीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा काळाबाजार होऊ शकतो. त्यातच अनेक औद्योगिक कंपन्यांना ऑक्सिजन पुरवठा होतो. या कंपन्या भविष्यात ऑक्सिजनची साठवणूक करून त्याची काळ्या बाजारात विक्री करू शकतात. ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याने ऑक्सिजनचा वापर फक्त वैद्यकीय वापरासाठी करावा.

औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन देऊ नये. ऑक्सिजन तयार करणाऱ्या कंपन्या अधिकृत कराव्यात. त्यावर नियंत्रण ठेवावे. जेणेकरून भविष्यात ऑक्सिजनचा काळाबाजार होणार नाही. त्याचा तुटवडा निर्माण होणार नाही, असे कामठे यांनी निवेदनात म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.