Pimpri News : कॅम्प परिसरातील नागरिकांसाठी पिंपरी पोलीस चौकीत कोरोना अँटिजेन टेस्ट शिबिर

एमपीसी न्यूज – पिंपरी कॅम्प परिसरातील नागरिकांसाठी पिंपरी पोलिसांच्या वतीने कोरोना रॅपिड अँटिजेन टेस्ट शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराची सुरुवात मंगळवारी (दि. 27) सकाळी साडेसात वाजता झाली. या शिबिराला नागरिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या संकल्पनेतून रॅपिड अँटिजेन टेस्ट शिबिर घेण्यात येत आहे. 22 एप्रिल रोजी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दापोडी चौकीत अशा प्रकारचे शिबिर घेण्यात आले. दापोडी मार्केट मधील विक्रेत्यांसह विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांची या शिबिरात टेस्ट करण्यात आली. यात काही जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. लक्षणे नसणाऱ्यांना होम क्वारंटाईन तर लक्षणे असणाऱ्यांना योग्य उपचारासाठी दाखल करण्यात आले.

त्यानंतर पिंपरी चौकीमध्ये आज अशा प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात आले असून शिबिराला सकाळी सुरुवात झाली. कोरोनाचा प्रसार फार वेगाने होत आहे. हॉस्पिटलमध्ये बेड मिळणं सध्या जिकरीचे झाले आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहेत. ही मोहीम पुढे वाढवून पोलिसांकडून जनजागृतीपर काम देखील मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चौकीत हे शिबिर घेण्यात येत असल्याचे सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कडवे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.