Pimpri News: शहरातील कोरोना बळींची संख्या पाचशेपार, अवघ्या 11 दिवसात 175 जणांचा मृत्यू

Pimpri News: Corona death toll rises to 175 in 11 days शहरातील कोरोनाचा पहिला बळी 12 एप्रिल रोजी गेला होता. थेरगाव भागातील एका पुरुषाचा मृत्यू झाला होता. मे अखेरपर्यंत केवळ 8 जणांचा मृत्यू झाला होता. जूनअखेरपर्यंत शहरातील कोरोना बळींची संख्या 77 झाली होती.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूची संख्याही वाढली आहे. शहरातील 510 नागरिकांचा कोरोनाने आजपर्यंत बळी घेतला आहे. 1 ते 11 ऑगस्ट या 11 दिवसांत तब्बल 175 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच वृद्धांसह युवकांचाही मृत्यू होत आहे. श्वसनाचा त्रास होत असलेल्या रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. परिणामी, मृत्यू वाढत असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्टपणे दिसून येत आहे. मृत्यू रोखण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरातील रुग्णसंख्या 31 हजाराच्या उंबरठ्यावर आहे. तर, 21 हजार 798 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. शहरातील वाढत्या रुग्णसंख्येत श्वास घेण्याचा त्रास होणा-या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मृत्यूच्या संख्येत देखील वाढ होत आहे.

शहरातील कोरोनाचा पहिला बळी 12 एप्रिल रोजी गेला होता. थेरगाव भागातील एका पुरुषाचा मृत्यू झाला होता. मे अखेरपर्यंत केवळ 8 जणांचा मृत्यू झाला होता. जूनअखेरपर्यंत शहरातील कोरोना बळींची संख्या 77 झाली होती.

जुलै महिन्यात वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूची संख्याही प्रचंड वाढली आहे. जुलै महिन्यात तब्बल 258 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर, एकूण मृत्यू संख्या 335 वर पोहोचली होती. कालपर्यंत शहरातील 510 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

ऑगस्टच्या पहिल्या दिवसांपासून रुग्णवाढीचा आलेख उंचावलेलाच राहिला. त्यासोबतच मृत्यूच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे. 1 ते 11 ऑगस्ट केवळ 11 दिवसात तब्बल 175 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूचे वाढते प्रमाण पाहता चिंता व्यक्त केली जात आहे.

रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने मृत्यूची टक्केवारी कमी दिसून येत आहे. प्रत्यक्षात मात्र मृत्यू संख्या प्रचंड वाढली आहे. मृत्यू रोखणे प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान, शहराबाहेरील पण पालिका रुग्णालयात उपचार घेणा-या 117 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मृत्युदर एक टक्क्यांपेक्षाही कमीच आहे. लागण झालेल्यांची संख्याच जास्त असल्यामुळे मृत्यूची संख्या वाढत आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी म्हटले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.