Pimpri news: कोरोनामुळे यंदा फटाका बाजाराला ‘फटका’

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे यंदाच्या दिवाळीत सर्वात मोठा आर्थिक फटका हा फटाक्यांच्या बाजारपेठेला बसण्याची शक्यता आहे. मार्चपासून असलेल्या लॉकडाऊनमुळे फटाका कारखान्याकडून फटाक्यांची निर्मिती होऊ शकली नाही. परिणामी, पिंपरी-चिंचवड शहरातील आवकही कमी झाली आहे. त्यामुळे यंदा फटक्यांची उलाढाल निम्मीच होण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे.

पुणे शहर, उपनगर, पिंपरी-चिंचवड परिसरात दिवाळीच्या काळात कोट्यवधीची फटाके विक्री होते. शहर आणि परिसरात सुमारे 2 हजार फटके विक्रेते आहेत. विक्रेते गणेशोत्सवापूर्वीच आवश्यक असलेल्या फटाक्यांची आवक करत असतात.

मार्चमध्ये फटकानिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना आगाऊ पैसे देत असतात. यंदा कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे विक्रेत्यांना पैसे देऊन बुकिंग करता आले नाही. त्याचबरोर फटाकेनिर्मिती करणारे कारखाने बंद होते. त्याचाही परिणाम जाणवणार आहे.

पूर्वीच्या संख्येत कामगार कारखान्यात काम करू शकत नाहीत. कोरोनामुळे कामगारांच्या उपस्थितीवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे अनेक कारखान्यांमधील फटाकानिर्मिती 20 ते 30 टक्क्यांवर आली आहे. याचा परिणाम शहरातील फटाके विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर होणार असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 5 टक्के भाववाढ होण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षांपासून फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ होत असल्याने फटाके न फोडण्याचे आवाहन करण्यात येते. त्याचाही फटाके विक्रीला फटका बसणार आहे.

फटाके विक्रेते अमोल शिंदे म्हणाले, ”फटाक्याची मागणी वाढली तरी पुरवठा कमी असल्याने विक्रीस मर्यादा येणार आहेत. फटाक्यांचा सर्वाधिक पुरवठा हा तमिळनाडू येथील शिवाकाशी येथून होतो. परंतु, तेथे प्रदूषण होत असल्याने त्यांना सरकारने काही अटी घातल्या आहेत. त्यामुळे फटाकेनिर्मिती करण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. इतर ठिकाणचे कारखाने बंद आहेत. मागील वर्षी सर्व काही सुरळीत असतानाही फटाक्यांचा पुरवठा होण्यास अडचणी आल्या होत्या”.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.