Pimpri news: शहरात कोरोनाचा उद्रेक! भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात पालिकेची क्षमता संपत चालली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरू आहे. शहरात दिवसाला 1 हजार ते 1200 नवीन रुग्णांची भर पडत आहेत. पालिका कोरोना रोखण्यात अपयशी ठरत असल्याचे आरोप होत असताना पालिकेत सत्तेत असलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकार स्थानिक प्रशासनावर जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप करत पालिकेची क्षमता संपत चालली आहे, असे भाष्य केले. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोरवाडीत पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्य शासन मातोश्रीत बसून नियोजन करत असल्याचा आभास निर्माण करत आहे. पिंपरी-चिंचवड पालिकेने कोरोनासाठी सहा महिन्यात 150 कोटी रुपये खर्च केले आहेत.

राज्य सरकारने जम्बो कोविड सेंटरसाठी देखील पालिकेकडून त्यांचा हिस्सा घेतला आहे. मात्र, स्थानिक प्रशासनावर जबाबदारी ढकलली जात आहे. पुणे, पिंपरी- चिंचवड महापालिकेची क्षमता संपत चालली आहे. तर, दुसरीकडे पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर पालिकेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे सांगत आहेत.

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यावर बोलताना पाटील म्हणाले की, काँग्रेसच्या अनेक नेत्यांना मराठा आरक्षण मान्य नाही. मान्य होते तर 15 वर्ष सत्तेत असताना का दिले नाही. कोर्टात नीट केस चालविली नाही. वकील दिशाहीन होते, असेही पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.