Pimpri News: शहरात कोरोनाची रुग्णसंख्या स्थिर होतेय, पण वाढते मृत्यू चिंताजनक; 19 दिवसांत तब्बल 384 जणांचा मृत्यू

शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 38 हजाराच्या उंबरठ्यावर आहे. तर, 25 हजार 399 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या स्थिर होताना दिसून येत आहे. एक हजाराच्या आत कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. पण, कोरोना बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसाला 20 हून अधिक जणांचा मृत्यू होत आहे. बुधवारी एकाच दिवशी तब्बल 41 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 ते 19 ऑगस्ट या 19 दिवसांत शहरातील तब्बल 384 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. शहरातील कोरोना बळींची संख्या 719 वर पोहोचली आहे. वाढते मृत्यू, ज्येष्ठांसह युवकांचाही मृत्यू होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मृत्यू रोखण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे.

शहरातील रुग्णसंख्येत जुलै महिन्यात झपाट्याने वाढ झाली आहे. ऑगस्टच्या पंधरवड्यात देखील रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मागील चार पाच दिवसांपासून हजाराच्या आतमध्ये नवीन रुग्ण सापडत आहेत. सप्टेंबरमध्ये रुग्णवाढ स्थिर होऊन कमी होईल असा प्रशासनाचा कयास आहे. शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 38 हजाराच्या उंबरठ्यावर आहे. तर, 25 हजार 399 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

शहरातील रुग्णसंख्या स्थिर होताना दिसून येत आहे. पण, मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मागील काही दिवसांपासून दिवसाला 20 ते 25 जणांचे मृत्यू होत आहेत. बुधवारी एकाचदिवशी 41 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वाढत्या मृतांमध्ये विविध आजार, ज्येष्ठांचे प्रमाण जास्त आहे. याशिवाय युवकांचाही कोरोनामुळे मृत्यू होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

_MPC_DIR_MPU_II

शहरातील कोरोनाचा पहिला बळी 12 एप्रिल रोजी गेला होता. थेरगाव भागातील एका पुरुषाचा मृत्यू झाला होता. मे अखेरपर्यंत केवळ 8 जणांचा मृत्यू झाला होता. जूनअखेर पर्यंत शहरातील कोरोना बळींची संख्या 77 झाली होती.

जुलै महिन्यात वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूची संख्याही प्रचंड वाढली आहे. जुलै महिन्यात तब्बल 258 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर, एकूण मृत्यू संख्या 335 वर पोहोचली होती. कालपर्यंत शहरातील तब्बल 719 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

ऑगस्टच्या पहिल्या दिवसांपासून रुग्णवाढीचा आलेख उंचावलेलाच राहिला. त्यासोबतच मृत्यूच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे. 1 ते 19 ऑगस्ट केवळ 19 दिवसात तब्बल 384 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूचे वाढते प्रमाण पाहता चिंता व्यक्त केली जात आहे.

रुग्णसंख्या वाढली असल्याने मृत्यूची टक्केवारी दीड ते पावणेदोन टक्क्यांपर्यंतच कमी दिसून येत आहे. प्रत्यक्षात मात्र मृत्यू संख्या प्रचंड वाढली आहे. मृत्यू रोखणे प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान, शहराबाहेरील पण पालिका रुग्णालयात उपचार घेणा-या 141 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णवाढल्यामुळे मृत्यूची संख्या वाढल्याचे पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1