Pimpri News : मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून ‘सुपर स्प्रेडर्स’ची कोरोना चाचणी

एमपीसी न्यूज – अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांचा विविध व्यक्तींशी येणाऱ्या संपर्क आणि त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता यामुळे महापालिकेकडून जागेवर जाऊन ‘सुपर स्प्रेडर्स’ होऊ शकणाऱ्या दुकानदारांची कोरोना चाचणी केले जात आहे. दर 15 दिवसाला मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून दुकानदारांची अँटिजेन चाचणी केली जाते. पॉझिटिव्ह आलेल्या दुकानदारांना उपचाराचा सल्ला दिला जातो. कोरोनाचे तत्काळ निदान होत असल्याने कोरोनाचा प्रसार नियंत्रणात रहाण्यासाठी मदत होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाची दुसरी लाट तीव्र होती. या लाटेत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. जूनमध्ये दुसरी लाट ओसरली. रुग्णसंख्या नियंत्रणात आली. आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिसरी लाट थोपविण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

अत्यावश्यक सेवेतील नागरिकांचा दररोज विविध नागरिकांशी संपर्क येतो. दुकानदार, भाजी विक्रेते, पथारीवाले, वाहनचालक, एसटी आणि पीएमपीएमएलमध्ये काम करणारे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, शिक्षक, आरोग्य सेवा देणा-या व्यक्ती आदींचा ‘सुपर स्प्रेडर्स’मध्ये समावेश येतो.

एखादा दुकानदार पॉझिटिव्ह असल्यास कोरोनाचा प्रसार होण्याची भीती आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने ‘सुपर स्प्रेडर्स’वर लक्ष केंद्रित केले आहे. मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून पालिकेकडून दुकानदारांची जागेवर जाऊन कोरोनाची अँटीजेन चाचणी केली जाते.

दर 15 दिवसाला चाचणी केली जाते. तसेच दुकानदारांना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवणे आणि दर 15 दिवसाला चाचणी करणे बंधनकारक केले आहे. महापालिकेकडून मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून दुकानदारांची कोरोना अँटिजेन चाचणी जात असल्याचे वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

महापालिका आकुर्डी रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता साळवे म्हणाल्या, दुकानदार,हॉटेल, पथारीवाले या ‘सुपर स्प्रेडर्स’ लोकांची दर 15 दिवसाला अँटीजेन चाचणी केली जाते. निगेटिव्ह रिपोर्ट सोबत ठेवणे बंधनकारक केले आहे. या लोकांचा दररोज हजारो लोकांशी संपर्क येतो. एखादा पॉझिटिव्ह आल्यास त्यांच्या दुकानात आलेल्या प्रत्येकाला कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे मोबाईल व्हॅन ठेवल्या असून भरारी पथकाची मदत घेऊन दुकानदारांची कोरोना चाचणी केली जाते. मोबाईल व्हॅनमध्ये वैद्यकीय अधिकारी, डेंटिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मदतनीस अशा 5 लोकांची टीम असते. नागरिक चाचणीला येत नाहीत. त्यामुळे जागेवर जाऊन चाचणी करणे गरजेचे आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.