Corona vaccination News: महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे कोरोना लसीकरण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (बुधवारी) कोरोनाची लस घेतली. पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात आज सकाळी आयुक्त हर्डीकर  यांना कोरोनाची लस देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहरात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या आठ केंद्रावर लसीकरण केले जात आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकिय क्षेत्रातील लोकांना प्राधान्याने लस देण्यात येत आहे. आजपर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील 1 हजार 182 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना आज  कोरोनाची लस देण्यात आली.  जिजामाता रुग्णालयात त्यांनी लस घेतली. यावेळी अतिरिक्त वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे, जनता संपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

लस घेतल्यानंतर मला कोणताही त्रास झाला नाही. लसीकरणानंतर नियमानुसार मी अर्धा तास रुग्णालयात थांबलो. यावेळेत कोणताही त्रास जाणवला नाही. त्यामुळे सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली.

वैद्यकिय क्षेत्रातील लोकांचे लसीकरण झाल्यानंतर दुस-या टप्प्यात शासकीय कर्मचा-यांना लस देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, आरोग्य सेवा पुणे मंडळ यांच्याकडून कोविड 19 लसीकरणासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेला 15 हजार डोस प्राप्त झाले आहेत. महापालिका, खासगी रुग्णालयातील अशा 17 हजार 792 आरोग्य सेवा देणा-या लाभार्थींची महापालिकेकडे नोंदणी झालेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.