Pimpri News: शहरातील ‘या’ 16 ठिकाणी होणार कोरोना लसीकरण

एमपीसी न्यूज – देशभरात 16 जानेवारीपासून कोरोनाचे लसीकरण सुरु होणार आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात 16 लसीकरण केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. काही खासगी रुग्णालये आणि महपालिका रुग्णालयांमध्ये लसीकरण होणार आहे. एका केंद्रावर दिवसाला 100 असे 16 केंद्रावर दिवसभरात 1600 जणांना लस देण्यात येणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे.

याबाबतची माहिती अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड -19 वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी शासनाकडून कोविड-19 लसीकरण 16 जानेवारी 2021 पासून सुरू करण्याबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत. लस आरोग्य सेवा देणा-या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना प्राधान्याने देण्यात येणार आहे.

महापालिकेने कोविड -19 लसीकरणासाठी 16 लसीकरण केंद्रे निश्चित केली आहेत. त्यात नवीन जिजामाता रुग्णालय, यमुनानगर रुग्णालय, नेहरुनगर दवाखाना, तालेरा रुग्णालय, वायसीएम रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, ईएसआयएस रुग्णालय, कामत हॉस्पीटल, जुने भोसरी रुग्णालय, कासारवाडी दवाखाना, डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज, अक्वॉर्ड संत ज्ञानेश्वर हॉस्पीटल, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पीटल, स्टर्लिंग हॉस्पीटल ॲण्ड आयुर्वेद मेडिकल कॉलेज, पिंपळेनिलख दवाखाना आणि प्रेमलोक पार्क दवाखाना या ठिकाणी आरोग्य सेवा देणा-या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांचे लसीकरण होणार आहे.

लसीकरणासाठी नागरिकाने दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. फोटो व आयडी तपासला जाईल. त्यानंतर लस देण्यात येईल. लस दिल्यानंतर अर्धातास देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर काही त्रास होत नसल्यास घरी सोडण्यात येईल. लसीकरणासाठी परिचारिका, आशा वर्कर यांची नेमणूक केली आहे. गोंधळ होवू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात येणार आहे, असे डॉ. साळवे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.