Pimpri corona News: शहरातील ‘या’ भागात होतेय कोरोनाची रुग्णवाढ, बाधितांमध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक

आयुक्त राजेश पाटील यांची माहिती : गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी, घाबरण्याची परिस्थिती नाही,

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. पिंपरी, भोसरी, दिघी, मोशी, पिंपळेगुरव, पिंपळेसौदागर या भागात रुग्ण वाढत आहेत. बाधितांमध्ये 16 ते 18 या वयोगटातील तरुण, तरुणींचा सर्वाधिक समावेश आहे. जुन्याच स्ट्रेनचे रुग्ण असून गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी आहे. ‘पॅनिक’ परिस्थिती नसल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंगवर भर देणार असून नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन केल्यास लॉकडऊनची गरज पडणार नाही, असेही ते म्हणाले.

शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिका करत असलेल्या उपाययोजनांची आयुक्तांनी माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अजित पवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यावेळी उपस्थित होते.

आयुक्त राजेश पाटील म्हणाले, शहरात सध्या 3164 सक्रिय रुग्ण आहेत. 2427 रुग्ण होम आयसोलेटमध्ये आहेत. तर, 743 रुग्णांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. त्यामध्ये गंभीर रुग्ण कमी आहेत. वाढत्या रुग्णसंख्येत 16 ते 18 वयोगटातील तरुण, तरुणींचे प्रमाण जास्त आहे. तरुण, तरुणी बाहेर पडत आहेत. गर्दी करतात. त्यामुळे बाधितांमध्ये त्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. बाधिताच्या संपर्कातील 10 ते 20 जणांची तपासणी केली जात आहे.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनाच्या मुकाबला करण्यासाठी महापालिकेने पूर्ण तयारी केली आहे. 2575 बेडची उपलब्धता आहे. कोविड केअर सेंटरमध्ये 400, डीसीएचसी, डीसीएचमध्ये 934, व्हेंटिलेटरसह आयसीयूचे 127, आयसीयूचे 275 अशी बेडची व्यवस्था पुरेशी आहे. सध्या दिवसाला दोन हजार चाचण्या केल्या जात आहेत. सोमवारपर्यंत तीन हजार केल्या जातील. चार हजारांपर्यंत चाचण्या वाढविल्या जाणार आहेत.

कोरोना नियमांचे उल्लंघन करणा-या 18 हॉटेलवर दंडात्मक कारवाई

रात्रीची संचारबंदी आहे. शाळा, महाविद्यालये बंद आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट, मॉलवर कारवाई केली जात आहे. राज्य उत्पादन शुल्क अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी, हवालदार अशी टीम असलेले महापालिकेचे पथक आठही प्रभागात कार्यरत आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणा-या हॉटेलवर कारवाई केली जात आहे.

आजपर्यंत 18 हॉटेलवर दंडात्मक कारवाई केली असून त्यांच्याकडून 45 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. जिथे शक्य आहे. तेथील भाजी मार्केट शिफ्ट केले आहेत. जिथे शक्य नाही. तिथे एकदिवसाआड मार्केट भरविण्याचे नियोजन केले जाणार असल्याचेही आयुक्त पाटील यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.