Pimpri news: कोरोनाची परिस्थिती गंभीर होतेय, खासगी रुग्णालये ताब्यात घेवून ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता वाढवा – खासदार बारणे

खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लूट; स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठविले पत्र

एमपीसीन्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. दिवसाला 1 हजार ते 1200 नवीन रुग्ण सापडत आहेत. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांना बेड मिळत नाहीत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडअभावी रुग्णांना आपला प्राण गमवावा लागत आहे. भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी खासगी रुग्णालये ताब्यात घेवून ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता वाढवावी. त्यांना वैद्यकीय कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पालिका आयुक्तांना केली आहे.

काही खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट केली जात आहे. त्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र कक्ष करावा. नागरिकांना त्यातून दिलासा द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

याबाबत खासदार बारणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, विभागीय आयुक्त सौरभ राव यांना पत्र पाठविले आहे.

त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील कोणत्याही खासगी रुग्णलायत बेड उपलब्ध होत नाहीत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड मिळत नाहीत, अशी गंभीर परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे. बेड उपलब्ध होत नसल्याच्या अनेक तक्रारी लोकप्रतिनिधींकडे दररोज येत आहेत. या रुग्णालयातून त्या रुग्णालयात अशी रुग्णांची फरफट होत आहे.

त्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. पालिका, राज्य सरकारने उभारलेले कोविड सेंटर देखील फुल झाले आहेत. सेंटरमध्ये देखील जागा उपलब्ध होत नाही. शहराच्या आजूबाजूला मावळ, खेड, चाकण, जुन्नर, आंबेगावमधून अनेक रुग्ण शहरात येतात. त्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे.

यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. पालिकेने जास्तीत जास्त खासगी रुग्णालयावर नियंत्रण ठेवावे. बेड उपलब्ध करून द्यावेत. शहरात आजदेखील बऱ्याच ओपीडी बंद आहेत. त्यामुळे अनेक डॉक्टर उपलब्ध होतील. खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरसोबत कॉन्फरन्स घ्यावी. त्यांना कोविड सेंटर, खासगी रुग्णालयात उपलब्ध करून घ्यावे.

खासगी रुग्णालयांना डॉक्टर, परिचारिका हा वैद्यकीय कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावा. यासाठी देखील पालिकेने प्रयत्न केले पाहिजेत. आज परिस्थिती भयानक आहे. यापेक्षा आणखी परिस्थिती वाढण्याची चिन्हे आहेत. कालपासून बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाहीत.

बेड उपलब्धतेसाठी पुण्यातील देखील अनेक रुग्णालयांना मी फोन करतो. पण, कोठेही तत्काळ व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नाही, अशी अस्वस्था आहे. त्यामुळे रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. कोविड बाधित रुग्णांचे कुटुंबीय प्रचंड मानसिक तणावाखाली जात आहेत.

खासगी रुग्णांलयांचे दर जास्त आहेत. काही रुग्णालये कोरोना रुग्णाकडून अव्वाच्या सव्वा बिलांची आकारणी करतात. त्यामुळे लूट होतेय, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

पालकमंत्र्यांनी बैठक घेतली त्यावेळेस खासगी रुग्णालयावर पालिकेचे नियंत्रण असावे हा मुद्दा मी वेळोवेळी उपस्थित केला होता. बिलांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र अधिकारी नेमावा आणि त्या तक्रारींचे निराकरण करावे. कक्ष स्थापन करावा. नागरिकांना त्यातून दिलासा द्यावा, असेही खासदार बारणे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.