Pimpri News: कोरोनाचे ‘क्रिटिकल’ रुग्ण ऑक्सिजन बेडसाठी वेटिंगवर, प्रशासनाचे दावे फोल

Pimpri News: Corona's 'critical' patient waiting for oxygen bed ऑक्सिजनयुक्त बेडच्या कमतरतेबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून कोरोना रुग्णांसाठी बेडची कमतरता नसल्याचे दावे करत असले. तरी, प्रत्यक्षात रुग्णांना ऑक्सिजनयुक्त बेड मिळत नाही. गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांना देखील वेटिंगवर थांबावे लागत आहे. श्वसनाचा त्रास, गंभीर रुग्णांना वेळीच बेड मिळत नाहीत. परिणामी, मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. शहरातील रुग्णसंख्या 30 हजार पार झाली आहे. ऑगस्टअखेरपर्यंत 50 हजार होण्याचा अंदाज प्रशासनाचा आहे. मागील काही दिवसांपासून श्वास घेण्याचा त्रास होणा-या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

या रुग्णांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता पालिकेकडून ऑक्सिजनयुक्त बेडची उपलब्धता वाढविणे अपेक्षित होते. केवळ बेडची उपलब्धता वाढविली आहे. बेडची कमरता नसल्याचे पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून दावे केले जात असले. तरी, प्रत्यक्षात ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्ण, नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पालिकेच्या कोविड समर्पित वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त बेड मिळत नाही. दुपारनंतर रुग्णांचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर बेडची उपलब्धता आहे की नाही असे कळविले जाईल, असे रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालय प्रशासनाकडून सांगितले जाते. क्रिटीकल रुग्ण असून देखील त्यांना तत्काळ बेडची उपलब्धता होत नाही. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

मागील काही दिवसांपासून शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसाला एक हजारहून अधिक जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामध्ये श्वासनाचा त्रास होणा-या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे.

आजपर्यंत शहरातील तब्बल 496 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून दिवसाला 17 ते 20 जणांचा मृत्यू होत आहे. यामध्ये 12, 21, 30 ते 40 या वयोगटातील रुग्णांचाही समावेश आहे. मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे. लहान मुले, तरुण, युवकांचाही कोरोनामुळे मृत्यू होऊ लागल्याने भीती, चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, ऑक्सिजनयुक्त बेडच्या कमतरतेबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.