Pimpri corona News: कोरोनाचा युवकांना सर्वाधिक विळखा; तब्बल 34 हजार 242 युवकांना झाली बाधा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा आलेख उतरणीस येत आहे. पण, 10 मार्चपासून शहरातील 84 हजार 794 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये युवकांना कोरोनाने अशरक्ष: विळखा घातला. तब्बल 34 हजार 242 युवकांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली असून हे सर्वाधिक प्रमाण आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. मार्च, एप्रिल आणि अर्धा मे महिना शहरातील परिस्थितीती नियंत्रणात होती. मे नंतर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली.

जुन, जुलै महिन्यात तर कोरोनाचा कहर झाला. दिवसाला दीड ते दोन हजार नवीन रुग्ण सापडत होते. बेड उपलब्ध होत नव्हते. या दोन महिन्यातच मृत्यूचे प्रमाण देखील सर्वाधिक आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये देखील रुग्णवाढीचा आलेख चढताच होता.

ऑक्टोबरमध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असून, कोरोनाचा आलेख उतरणीस लागला आहे. पाचशेच्या आतमध्येच नवीन रुग्ण सापडत आहेत. हे आशादायक चित्र मानले जात आहे.

10 मार्चपासून आज 14 ऑक्टोबरपर्यंत शहरातील 84 हजार 794 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 79 हजार 913 जणांनी कोरोनाविरोधातील लढाई यशस्वीपणे जिंकली आहे.

शहरातील 1440 जणांचा आजपर्यंत कोरोनाने बळी घेतला आहे. आजमितीला 3 हजार 442 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 2 हजार 743 रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत.

केवळ त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. तर, 493 रुग्णांमध्ये लक्षणे आहेत. 140 रुग्णांची प्रकृती गंभीर असून 60 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

कोणत्या वयोगटातील कितीजणांना कोरोनाची बाधा ?

कोरोनाचा सर्वाधिक धोका वयोवृद्ध आणि लहान मुलांना असला तरी लागण होण्याचे प्रमाण युवकांना अधिक आहे. 22 ते 39 वय वर्ष असलेल्या शहरातील 34 हजार 242 युवकांना कोरोनाची आत्तापर्यंत लागण झाली आहे. हे सर्वाधिक प्रमाण आहे.

त्याखालोखाल 40 ते 59 वयवर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 25 हजार 806 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

60 वर्षापुढील 11 हजार 304 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 6 हजार 933 तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 6 हजार 447 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.