Pimpri News: कोरोनाचे रुग्ण वाढले ! मास्क वापरा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा – आयुक्त पाटील

कोरोनाच्या चाचण्या वाढविणार

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांत पिंपरी-चिंचवड शहरात थोड्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. हॉटेल, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शहरवासीयांना केले.

योग्य ती काळजी घेतली जात असून कोरोनाच्या चाचण्या वाढविणार असल्याचेही त्यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

मागील आठ ते दहा दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दिवसाला 250 ते 300 च्या पटीने रुग्णवाढ होत आहे. त्यापार्श्वभूमीवर महापालिका काय कठोर निर्णय घेणार आहे का, याबाबाबत विचारले असता आयुक्त पाटील म्हणाले, जास्त केसेस वाढल्या नाहीत. थोड्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. त्यावर योग्य ती काळजी घेतली जात आहे.

कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्यांच्या चाचण्या केल्या जातात. लक्षणे असलेल्यांना ट्रेसिंग करुन टेस्टिंगसाठी पाठविले जाते. सध्या चाचण्यांचे प्रमाण ठीक असले तरी चाचण्या वाढविल्या जातील.

नागरिकांनी मास्कचा वापर करावा. वारंवार हात धुवावा. गर्दी करु नये, हॉटेल, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. सुरक्षित अंतराचे पालन करावे. मास्कचा वापर करण्याबाबत जनजागृती केली जात आहे. विनामास्क फिरणा-यांवर दंडात्मक कारवाई तीव्र केली असल्याचेही आयुक्त पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.