Pimpri news: ‘शहरात कोरोनाची अभूतपूर्व परिस्थिती; आयुक्तांनी स्वतःच्या अधिकारात रेमडिसेवीर इंजेक्शनची खरेदी करावी’ – संदीप वाघेरे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाची अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांना इंजेक्शन, औषध, उपलब्ध होत नाहीत. नागरिक हवालदिल झाले आहेत. गंभीर, अतिगंभीर रुग्णांना उपयुक्त ठरत असलेल्या रेमडिसेवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे. अशा परिस्थितीत त्याची खरेदी कोणी थांबविली, का थांबविली, याच्याशी शहरातील करदात्यांना काही घेणेदेणे नाही. त्यामुळे आयुक्तांनी स्वतःच्या अधिकारात रेमडिसेवीरची खरेदी करावी, अशी मागणी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेवक वाघेरे यांनी म्हटले आहे की, शहरात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये भयानक वाढ होत आहे. रुग्णवाढीचा आलेख चढताच आहे. तो कमी होताना दिसत नाही. वाढती रुग्णसंख्या पाहता हा स्ट्रेन अधिक धोकादायक असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या रुग्णसंख्येत गंभीर, अतिगंभीर रुग्णांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या रुग्णांना रेमडिसेवीर इंजेक्शन उपयुक्त ठरत आहे.

शहरातील सामान्य नागरिकांना बाजारातील रेमडिसेवीर इंजेक्शनचे दर परवडणारे नाहीत. असे असताना महापालिकेकडे या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. अतिगंभीर रुग्णांना रेमडिसेवीर इंजेक्शन मिळत नाही. त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे. काळ्या बाजारात चढ्या दराने रेमडिसेवीरची विक्री केली जात आहे. अशी अभूतपूर्व, भयानक परिस्थिती असतानाही महापालिका इंजेक्शनची खरेदी करत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.

रेमडिसेवीरचा प्रचंड तुटवडा आहे. लोक हवालदिल झाले आहेत. गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत इंजेक्शनची खरेदी थांबविली हे दुर्देव आहे. शहरातील नागरिकांच्या आराेग्याची जबाबदारी ही महापालिकेची असल्याने आयुक्तांनी स्वतःच्या अधिकारात रेमडिसेवीरची खरेदी करून शहरातील नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी प्रयन्त करावेत, अशी विनंती नगरसेवक वाघेरे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.