Pimpri News: पालिका पवना नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांना पवना धरणातून बंद जलवाहिनीद्वारे थेट पाणी आणणे या प्रकल्पाअंतर्गत पवना नदीवर मावळ तालुक्यातील शिवणे आणि गहूंजे येथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात येणार आहेत.

या कामासाठी सल्लामसलत व संकल्पना शुल्क म्हणून 36 लाख रूपये खडकवासला पाटबंधारे विभागाकडे भरण्यात येणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुर्ननिर्माण (जेएनएनयूआरएम) योजनेअंतर्गत पिंपरी – चिंचवड महापालिकेने पवना धरणातून बंद जलवाहिनीद्वारे निगडी येथील सेक्टर 23 मधील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत थेट पाणी आणणे या प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या कामास महापालिका हद्दीबाहेर पवना धरणग्रस्तांनी, स्थानिक शेतक-यांनी तसेच भारतीय किसान संघासह इतर संघटनांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे.

उच्च न्यायालयाने 19 ऑक्टोबर 2010 रोजी या संघटनांची याचिका फेटाळली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार, भारतीय किसान संघासह इतरांनी मुख्य अभियंता तथा प्राथमिक विवाद निवारण अधिकारी यांनी 27 जानेवारी 2010 रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे (एमडब्ल्यूआरडीए) अपील केले होते. या अपीलावर एमडब्ल्यूआरडीएने काही निर्देश देऊन पवना धरणातून थेट पाईपलाईन प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली. तसेच भारतीय किसान संघासह इतरांचे अपील फेटाळले.

एमडब्ल्यूआरडीएच्या निर्देशामध्ये पवना नदीवर पिंपरी – चिंचवड महापालिकेने स्वखर्चाने दोन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्याच्या कामाचा समावेश आहे. त्यानुसार, खडकवासला पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी अनामत ठेव रकमेवर पवना नदीवर मावळ तालुक्यातील शिवणे आणि गहूंजे येथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधणे प्रस्तावित असल्याचे महापालिकेस कळविले आहे.

त्यानुसार, महापालिकेने आतापर्यंत खडकवासला पाटबंधारे विभागास कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्याच्या सर्व्हेक्षणासाठी आणि सविस्तर अंदाजपत्रक तयार करण्यासाठी 7 लाख रूपये आणि भुशास्त्रीय कार्य कामासाठी 7 लाख 70 हजार रूपये असे एकूण 14 लाख 70 हजार रूपये दिले आहेत.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अनामत ठेव पद्धतीने पवना नदीवर शिवणे आणि गहूंजे येथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्याच्या कामासाठी निविदा काढून कामाचे आदेश देऊन काम सुरू करण्याबाबत खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना पत्राद्वारे कळविले आहे.

त्यानुसार, पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी या बंधा-याचे काम सल्लामसलत तत्वावर मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक यांच्याकडून करून घेण्याबाबत आणि त्यासोबत सल्लामसलत व संकल्पना शुल्क म्हणून 36 लाख 4 हजार रूपये शुल्क भरण्याबाबत 22 सप्टेंबर 2020 रोजीच्या पत्राद्वारे महापालिकेला कळविले आहे.

संकल्प चित्र मंडळाचे अधिक्षक अभियंता यांच्यामार्फत हे काम करण्यात येणार आहे. सन 2020-21 च्या अर्थसंकल्पात ‘पाणीपुरवठा टप्पा 1 जेएनएनयुआरएम’ या लेखाशिर्षाअंतर्गत कोल्हापूर बंधारा बांधण्यासाठी 20 कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे. त्यानुसार, अनामत ठेव रकमेवर खडकवासला पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांना शिवणे आणि गहूंजे येथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यासाठी सल्लामसलत व संकल्पना शुल्क म्हणून 36 लाख 4 हजार रूपये शुल्क देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.