Pimpri News: सिंचन पुर्नस्थापनेसाठी सुधारीत पाणीपट्टीपोटी उर्वरीत 37 लाख रूपये पालिका ‘पाटबंधारे’ला देणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून टप्पा क्रमांक चारसाठी 48.576 दशलक्ष घनमीटर एवढे पाणी पुर्नआरक्षित करण्याकरिता दोन महिन्याच्या सुधारीत पाणीपट्टीपोटी 3 कोटी 45 लाख रूपये अनामत रक्कम भरण्यात येणार आहे. त्यापैकी 3 कोटी 7 लाख रूपये महापालिकेने भरणा केले आहेत. उर्वरीत 37 लाख रूपयांची रक्कम पाटबंधारे विभागाकडे भरण्यात येणार आहेत.

महापालिका दररोज 480 एमएलडी पाणी धरणातून घेते. शहरासाठी पवना धरणातून टप्पा क्रमांक चारसाठी 48.576 दशलक्ष घनमीटर एवढे पाणी पुर्नआरक्षित करण्यास राज्य सरकारने 13 नोव्हेंबर 2018 रोजी मंजुरी दिली. त्या अनुषंगाने महापालिकेस सन 2019 मध्ये ज्ञापन आणि इरादा पत्र देण्यात आले आहे. या ज्ञापनातील सर्व अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

_MPC_DIR_MPU_II

मात्र, सिंचन पुर्नस्थापना खर्च एकरकमी भरणे बंधनकारक करण्याऐवजी सन 2018-19 पासून पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्याने घेण्यात यावा, असे धोरण ठरविण्यात आले. त्यामुळे या आरक्षणापोटी सिंचन पुर्नस्थापनेसाठी सन 2018-19 साठीच्या सिंचन पुर्नस्थापना खर्चापोटी 10 कोटी 8 लाख रूपये तसेच दोन महिन्याची पाणीपट्टी अनामत 53 लाख 57 हजार रूपयांचा धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) पाटबंधारे विभागाकडे जमा करण्यात आला आहे.

तसेच सन 2019-20 साठीच्या सिंचन पुर्नस्थापना खर्चाचा दुसरा हप्ता 10 कोटी 8 लाख रूपये भरणा करण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाने पत्राद्वारे दोन महिन्याची सुधारीत पाणीपट्टी अनामत रक्कम 3 कोटी 45 लाख रूपये येत असल्याचे तसेच यापूर्वी जमा 2 कोटी 54 लाख रूपये आणि सन 2018-19 मध्ये भरलेली अनामत 53 लाख 57 हजार रूपये वजा जाता उर्वरीत 37 लाख 43 हजार रूपये भरणा करण्यास आणि त्यानंतर करारनामा मंजूर करण्यात येणार असल्याबाबत कळविले आहे.

त्यानुसार, पवना धरणातून टप्पा क्रमांक चारसाठी 48.576 दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षणापोटी उर्वरीत अनामत रक्कम 37 लाख 43 हजार रूपयांचा धनादेश पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती सभेसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.