Pimpri News: मोघम तक्रारी करत नगरसेविका शेंडगे यांनी अडविले होते काम – आयुक्त पाटील

नगरसेवक आहेत म्हणून कोणी आपले नोकर नाही

एमपीसी न्यूज – मोघम तक्रारी करत नगरसेविका आशा शेंडगे यांनी त्यांच्या प्रभागातील स्मार्ट सिटीचे काम अडविले होते. काम वेळेत आणि लवकर पूर्ण केले जाईल असे कालच त्यांना सांगितले. असे असताना आज त्या शाई घेऊन आल्या. त्यांना काय सिद्ध करायचे होते हे माहित नाही. हात लांबवून माझी केबिन बंद केली. मला उपमुख्यमंत्र्यांच्या व्हीसीसाठी व्हिसीरुममध्ये जायचे होते. माझा रस्ता अडविला. त्यांना चर्चा करायची नव्हती. दुसरेच काही तरी करायचे होते, असे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. नगरसेवक आहेत म्हणून कोणी आपले नोकर नाही. त्यांच्या प्रभागात अधिकारी काम करायला धजावत नाहीत. त्यामुळे त्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचेही आयुक्त म्हणाले.

कासारवाडीत गणेशोत्सवात रस्ते खोदाई केली जात असल्याने रहदारीला अडथळा ठरत असल्याचे सांगत सत्ताधारी भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांनी आज (गुरुवारी) महापालिका आयुक्त राजेश पाटील, स्मार्ट सिटीचे सह शहर अभियंता अशोक भालकर यांच्या नामफलकावर, कार्यालयात शाई फेकली.

त्यानंतर आयुक्त पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, स्मार्ट सिटी अंतर्गत केबल टाकण्याचे काम शहरात चालू आहे. माहिती मागवत, मोघम आरोप करत काही ठिकाणी काम अडविले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सर्व फाऊंडेशन केबल नेटवर्किंग आहे. कामाला विलंब झाला असून नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे कालावधी निश्चित करुन सप्टेंबर अखेरपर्यंत कामे पूर्ण करुन ऑक्टोबरमध्ये स्मार्ट सिटीच्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

नगरसेविका आशा शेंडगे यांनी त्यांच्या प्रभागातील काम अडवून ठेवले होते. ते काम बुधवारी सुरु करण्यात आले. स्मार्ट सिटीचे सह शहर अभियंता अशोक भालकर यांनी त्यांची भेट घेऊन कमी वेळेत आणि लवकर काम करण्याचे आश्वासन दिले. कालही शेंडगे या माज्याकडे आल्या होत्या. त्यांच्याशी चर्चा झाली. काम थांबवू शकत नसल्याचे मी त्यांना सांगितले होते. त्यांच्या तक्रारींचे निराकरण केले होते. कोणतेही काम करायचे म्हटल्यास तेवढ्यापुरता त्रास होणारच. काल खोदलेले आज बुजून देखील टाकले. काम थांबवा, चर्चा करा आणि नंतर काम करा असे त्यांचे म्हणने होते. दीड वर्षे थांबलो. सर्वांत शेवटी हे काम हाती घेतले. त्यामुळे काम थांबवू शकत नसल्याचे मी त्यांना सांगितले. त्यांनी मोघम आरोप केले. काही पुरावे दिले. तर, निश्चितपणे चौकशी लावली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.

आज त्या पुन्हा आल्या असता काम थांबणार नाही. अधिकारी तुमच्याशी चर्चा करतील असे मी सांगितले. पण, आज येताना त्या शाई घेऊन आल्या. त्यांना काही सिद्ध करायचे होते हे माहित नाही. हात लांबवून माझी केबिन बंद केली. मला उपमुख्यमंत्र्यांच्या व्हीसीसाठी व्हीसीरुममध्ये जायचे होते. माझा रस्ता अडविला. तुम्हाला काही चर्चा करायची आहे का, बोलायचे का असे मी पुन्हा विचारले. पण, काम बंद करा, असे करा तसे करा म्हणत त्यांनी आरडाओरड केली. मग, भालकर यांच्या केबीनमध्ये गेले. तिथे काळे लावले. माझ्या नामफलकाला शाई लावली. आंदोलनाचे वेगळे मार्ग आहेत. भ्रष्टाचार होत असेल तर पुरावे द्यावेत. आम्ही ऐकत नसेल तर सीबीआय, एसीबी आहे. त्यांच्याकडे तक्रार करावी. एसीबीला पकडून द्यावे.

आयुक्तांच्या खुर्चीची गरीमा आहे. मलाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. तर, बाकीचे अधिकारी घाबरतील. त्यामुळे आम्ही पोलिसांत तक्रार दिली. योग्य ती कारवाई करण्यात येईल. त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याबाबत अद्याप मी विचार केला नाही. त्यांच्या बाबत सर्व अधिकारी तक्रार करतात. त्यांच्या प्रभागात काम करण्यास अधिकारी धजावत नाहीत. प्रभागातून दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करतात. याचे त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नगरसेवक आहेत म्हणून कोणी आपले नोकर नाही. त्यांना चर्चा करायची नव्हती. दुसरेच काही तरी करायचे होते, असेही आयुक्त पाटील म्हणाले. जो प्रकार माज्या केबिनमध्ये झाला. तो कोणत्याही अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये होईल. भ्रष्टाचार झाला असेल तर पुरावे द्यावेत. पण, आंदोलनाचे वेगळे मार्ग आहेत. पण, कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणी दिला असा सवालही आयुक्तांनी केला

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.