Pimpri News: नगरसेवकांना प्रभागातील कामांसाठी दरवर्षी मिळणार 25 लाख रुपये; स्थायी समितीची अर्थसंकल्पाला मंजुरी

एमपीसी न्यूज – नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात आवश्यक त्या कामांसाठी दरवर्षी प्रत्येकी 25 लाख रुपयांची तरतूद करावी, पद्मभूषण माजी खासदार राहुल बजाज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आकुर्डीमध्ये स्मारक उभारणे. शहरातील सर्व बीआरटी मार्गांवरील बसथांब्यांवर स्त्री आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृह उभारावे, वल्लभनगर येथे सुसज्ज पत्रकार भवन उभारावे या नवीन कामाच्या शिफारशीसह स्थायी समितीने वाढ घटीच्या 885 कोटी 66 लाख रुपयांच्या उपसुचना देत स्थायी समितीने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. अर्थसंकल्प अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा 2022-23 चा अर्थसंकल्प शुक्रवारी 18 फेब्रुवारी रोजी प्रशासनाने स्थायी समितीकडे सादर केला होता. अभ्यासासाठी तहकूब केलेली सभा आज (बुधवारी) पार पडली. या अर्थसंकल्पात वाढघटीच्या उपसुचनांव्दारे पुढील प्रमाणे शिफारस करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात 275 विकास कामांसाठी 885 कोटी 66 लाख रुपयांहून जास्त शिफारस करण्यात आली आहे. तसेच नविन 67 विकास कामांसाठी 66 कोटी, 87 लाख रुपयांहून जास्त शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्व नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात आवश्यक त्या कामांसाठी दरवर्षी प्रत्येकी 25 लाख रुपयांची तरतूद करावी अशीही शिफारस सर्वसाधारण सभेकडे करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पात ‘या’ नवीन कामांचा समावेश!

पर्यावरणाचा समतोल राखला जावा आणि शहरातील प्रदूषण कमी व्हावे यासाठी पदाधिकारी व अधिका-यांसाठी ‘ई – वाहन’ खरेदी करावेत ; पद्मभूषण माजी खासदार राहुल बजाज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आकुर्डीमध्ये स्मारक उभारणे ; शहरातील सर्व बीआरटी मार्गांवरील बसथांब्यांवर स्त्री आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृह उभारणे ; इंदोर पॅटर्न प्रमाणे शहरातील कचरा संकलन आणि प्रक्रिया करण्यास चालना देणे ; ‘स्वच्छाग्रह’ ब्रॅण्डव्दारे शहरभर स्वच्छता कायम राखली जाईल यासाठी नियोजन करणे ; भोसरीतील सहल केंद्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय ; कै. अंकुशराव लांडगे सभागृह मागील जागेत एसटीपी प्रकल्प ; उर्वरीत मोकळ्या जागेत महावितरण कंपनीसाठी स्विचिंग स्टेशन उभे करण्यास जागा देणे ; भोसरीतील नविन रुग्णालय पुर्ण क्षमतेने चालवून नागरिकांना चोविस तास अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुविधा देणे ; वाढत्या शहरीकरणामुळे शहरात विविध माध्यम प्रतिनिधींची संख्या देखिल वाढली आहे. या प्रतिनिधींसाठी पुणे – मुंबई महामार्गावर वल्लभनगर येथे सुसज्ज पत्रकार भवन उभारावे अशीही शिफारस सर्वसाधारण सभेकडे करण्यात आली आहे.

या अर्थसंकल्पामुळे पुढील काळात पिंपरी चिंचवड शहराचा स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक होईल. हा अर्थसंकल्प सर्व समावेशक आहे असेही स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.