मंगळवार, जानेवारी 31, 2023

Pimpri News: ‘जॅकवेल’मधील भ्रष्टाचारावार शिक्कामोर्तब, आता एकनाथ पवार राजकारणातून सन्यास कधी घेणार? – नाना काटे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri News) नागरिकांवर पाणीटंचाई लादणार्‍या भाजपाने जनतेच्या प्रश्नावर स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी भामा आसखेड येथे उभारण्यात येणार्‍या जॅकवेलच्या निविदेत तब्बल 30 कोटींचा भ्रष्टाचार करण्याचे पाप केले होते. हा भ्रष्टाचार उघडकीस आणल्यानंतर राजकारणातून सन्यास घेण्याची भाषा करणारे माजी सभागृह नेते एकनाथ पवार हे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केल्याने उघडे पडले आहेत. त्यांच्या पत्रामुळे भ्रष्टाचारावार शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे पवार यांनी राजकारणातून सन्यास कधी घेणार आहेत, त्याची तारीख जाहीर करावी, असे आव्हान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी दिले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारण सध्या जॅकवेल निविदेवरून तापले आहे. या निविदेमध्ये तब्बल 30 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने महापालिकेत आंदोलन केले होते. त्या आंदोलनाला आक्षेप घेत भाजपचे प्रवक्ते तथा माजी सभागृह नेते एकनाथ पवार यांनी राष्ट्रवादीवर टीका केली होती. तसेच शहरवासियांचे हक्काचे पाणी अडविण्याचे पाप राष्ट्रवादी करत असल्याचा आरोप केला होता. तसेच निविदेतील भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास राजकीय सन्यास घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर याच निविदेवर भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. तर शंकर जगताप यांनी या निविदेमध्ये 20 ते 25 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे मान्यच केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर शिक्कामोर्तब झाले आहे.

एकनाथ पवार यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना नाना काटे यांनी एका पत्रकाद्वारे उत्तर दिले आहे. या पत्रकात काटे यांनी म्हटले आहे की, शहरात गेली तीन वर्षे एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. शहरवासियांना गेली तीन वर्षे हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम भाजपच्या स्थानिक नेतेमंडळींनी केले. पाच वर्षांत काम न करू शकलेल्या भाजप नेत्यांना आता शहरातील नागरिकांच्या पाण्यासाठी नाटकी चिंता वाटू लागली आहे. राज्यात आलेल्या सत्तेच्या जोरावर भ्रष्टाचार करून स्वत:च्या तुंबड्या भरण्याचे काम महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून या लोकांनी सुरू केले आहे.

जॅकवेलच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार सुरू असल्याचा आम्ही (Pimpri News) आरोप केल्यानंतर एकनाथ पवार यांनी बाष्कळ बडबड करून आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन मांडले होते. ‘खोटे बोल पण रेटून बोल’ या पद्धतीचा अवलंब करणार्‍या पवारांना त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने तोंडावर पाडले आहे. या निविदेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप लक्ष्मण जगताप यांनी केल्यानेच भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे एकनाथ पवार  आणि भाजपचा भ्रष्टाचारी चेहराही उघडा पडला आहे. लक्ष्मण जगताप यांनी केलेला आरोप खरा आहे की खोटा हे पवार यांनी जाहीर करावे, अथवा राजकीय सन्यास घ्यावा, असा टोला काटे यांनी मारला आहे.

ठेकेदारही भाजप नेत्यांचाच – 

जॅकवेल निविदेमध्ये पात्र करण्यात आलेला ठेकेदार हा मध्यप्रदेश व छत्तीसगडमध्ये अपात्र ठरलेला आहे. राष्ट्रवादीवर बेछूट आरोप करणार्‍या एकनाथ पवारांनी हा ठेकेदार वरील दोन राज्यात अपात्र आहे की नाही ते जनतेला सांगावे. जनतेच्या पाणीटंचाईचे राजकारण करून स्वत:चे उखळ पांढरे करून घेणार्‍या पवार यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी ही निविदा तात्काळ रद्द करावी व जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही काटे यांनी केली आहे.

YCMH : यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयामध्ये मानधनावर 64 डॉक्‍टरांची भरती

Latest news
Related news