Pimpri news: कोरोना खरेदीत तुंबड्या भरणाऱ्यांना माफी नाही; पालिकेतील भ्रष्टाचार उखडून काढणार – डॉ. अमोल कोल्हे

विरोधाची धार वाढणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोना कालावधीत केलेल्या खरेदीवर आक्षेप आहेत. खरेदीत पाणी मुरत आहे. हे मयतावरच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. संकट काळात तुंबड्या भरण्याचे काम कोणी केले असेल तर त्यांना माफी नाही, असा गर्भित इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला. तसेच पालिकेतील पूर्ण भ्रष्टाचार उखडून काढणार आहोत. यापुढे आमची विरोधाची धार वाढणार आहे, असेही ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आज (शुक्रवारी) आकुर्डीत पार पडली. कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, अजित गव्हाणे, श्याम लांडे, विक्रांत लांडे, जगदीश शेट्टी, निहाल पानसरे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका सुलक्षणा धर, संगीता ताम्हणे, वर्षा जगताप, फजल शेख आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर डॉ. कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पालिकेच्या निविदा रात्री-अपरात्री मंजूर केल्या जात आहेत. त्याचे नेमके गौडबंगाल काय आहे. नदी सुधार प्रकल्पाचे काय झाले. स्मार्ट सिटीत शहराची घसरण झाली आहे. शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळत नाही. पाईप पडून आहेत. पाण्याचे कोणतेही नियोजन नाही. याची उत्तरे सत्ताधाऱ्यांना जनतेला द्यावी लागणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षांची भूमिका वठवली आहे. यापुढे मी नगरसेवकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. पालिकेतील पूर्ण भ्रष्टाचार उखडून काढणार आहोत. यापुढे आमची विरोधाची धार वाढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांबाबत सत्ताधाऱ्यांनी आडवा आणि जिरवाची भूमिका घेतल्यास अडविणाऱ्याची जिरविणार आहोत, असे डॉ. कोल्हे म्हणाले.

रॅपिड अँटीजेन टेस्टचे रिपोर्ट येण्यास दोन दिवस आणि आरटीपीसीआरचे रिपोर्ट येण्यास दहा दिवस लागत आहेत. हा अतिशय अक्षम्यपणा आहे. रिपोर्ट येईपर्यंत रुग्ण वाहक राहू शकतात. त्यामुळेच शहरातील रुग्णवाढ झालेली दिसून येते. हे प्रशासनाचे अपयश आहे, असेही डॉ. कोल्हे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.