Pimpri News: कोरोना रूग्णांना बेड साईड लॉकर पुरविण्यासाठी 38 लाखाचा खर्च

एमपीसी न्यूज – कोरोना केअर सेंटर आणि संस्थात्मक विलगीकरण कक्षातील व्यक्ती आणि रूग्णांसाठी दीड हजार बेड साईड लॉकर खरेदी करण्यात येणार आहेत. हे लॉकर पुरविण्यासाठी सहा ठेकेदारांना कामाचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी 38 लाख रूपये खर्च होणार आहे.

पिंपरी – चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोना बाधीत आणि संशयित रूग्णांपासून रोगाचा प्रसार थांबविणे आणि त्वरीत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी कोरोना केअर सेंटर आणि संस्थात्मक विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत. येथील व्यक्ती आणि रूग्णांसाठी 1 हजार 500 बेड साईड लॉकर खरेदी करण्यात येणार आहे.

या खरेदी प्रक्रीयेसाठी निविदा मागविण्यात आल्या. त्यामध्ये सहा निविदाधारकांनी निविदा सादर केल्या. निविदा अटींमध्ये जो निविदाधारक कमी दर सादर करेल, त्याच्या दरानुसार इतर निविदाधारकांना कामाची समान विभागणी करून देण्यात येईल, अशी अट होती.

त्यामध्ये निर्मिती इंजिनिअरींग वक्र्स या निविदाधारकाने प्रति बेड साईड लॉकरसाठी 2 हजार 530 रूपये असा लघुत्तम दर सादर केला.

निर्मिती इंजिनिअरींग यांनी सादर केलेल्या दरानुसार, निर्मिती इंजिनिअरींग यांच्यासह रेखा इंजिनिअरींग वर्क्स , ऑर्थोरॉन टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड एंटरप्रायजेस, आर्यन इक्युपमेंट, आद्या प्रॉपर्टीज, धर्मे एंटरप्रायजेस अशा सहा ठेकेदारांकडून प्रत्येकी 250 नग बेड साईड लॉकर खरेदी करण्यात येणार आहेत.

प्रति बेड साईड लॉकर 2 हजार 530 रूपये या दरानुसार, दीड हजार लॉकर खरेदीसाठी 37 लाख 95 हजार रूपये खर्च होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.