Pimpri News: भाजपकडून करयोग्य मुल्य वाढवून छुपी करवाढ – संजोग वाघेरे

एमपीसी न्यूज – कोरोना संकटामुळे नागरिक हवालदिल असताना सत्ताधारी भाजपकडून पिंपरी-चिंचवडकरांच्या डोळ्यात धुळफेक करून पालिका आयुक्तांना असलेल्या अधिकारात करयोग्य मुल्य वाढवून छुपी करवाढ लादण्यात आलेली आहे. ही अन्यायकारक करवाढ रद्द करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे – पाटील यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात वाघेरे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील अनुसुची ड प्रकरण 8 नियम 20 मधील ततुदीनुसार जुन्या मिळकतींच्या करयोग्य मुल्यांचे पुर्नमुल्यांकन करण्याचा अधिकार महानगरपालिका आयुक्तांना आहे. त्या अधिकाराचा वापर करून आगामी 2021-22 या आर्थिक वर्षासाठी करयोग्य मुल्य प्रति चौरस फूट दरात वाढ करण्याचा निर्णय महानगरपालिका करसकंलन विभागामार्फत घेण्यात आला आहे.

महानगरपालिका करसंकलन विभागाच्या आकडेवारीनुसार, या निर्णयामुळे 2005 पूर्वीच्या मिळकतींना दुप्पट मिळकत कर द्यावा लागणार आहे. तर 2006 नंतर नोंदणी झालेल्या मिळकतींच्या करयोग्य मुल्यात प्रति चौरस फूट दरात सरसकट 5 टक्के इतकी वाढ करण्यात येत आहे. त्याचा फटका पिंपरी-चिंचवडमधील 2005 पूर्वीच्या सुमारे अडीच लाख, तर 2006 नंतरच्या जवळपास तीन लाख मिळकतींना बसणार आहे.

कोरोना संकटामुळे आगामी आर्थिक वर्षासाठी कोणतीही करवाढ न करण्याचा दिखावा महानगरपालिकेतील सत्ताधारी असलेल्या भाजपकडून केला जात आहे. परंतु नेहमीप्रमाणे भाजपचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. उद्योगनगरी, कारखानदारीमुळे शहरात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत. मागील संपूर्ण वर्षात कोरोनाच्या संकटाचा परिणाम शहरातील सर्वच वर्गावर झालेला आहे. सद्यस्थितीत मिळकत कर व इतर कर भरण्यासाठी नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. या स्थितीचा विचार करून आगामी आर्थिक वर्षात कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा आर्थिक बोजा नागरिकांवर महानगरपालिका टाकणार नाही, अशी अपेक्षा होती.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून एकीकडे शास्तीकर भरण्यापासून शहरवासीयांना दिलासा देण्याची भूमिका घेतली. तर, दुसरीकडे कोटींची उधळपट्टी करण्यासाठी खर्च कमी पडू नये, म्हणून करवाढीचा हा पर्याय महानगरपालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपच्या वतीने निवडण्यात आल्याचे दिसते आहे.

महापालिका आयुक्त यांच्या अधिकाराचा गैरफायदा घेत प्रशासन व सत्ताधारी यांच्याकडून संगनमताने ही छुपी करवाढ शहरावर लादण्यात येत आहे. ही करवाढ करण्यामागे भाजपचे कारभारी असल्याचे या सगळ्यावरून स्पष्ट होते. तरी करयोग्य मुल्य वाढवून नागरिकांवर अतिरिक्त कराचा बोजा टाकणारा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.