Pimpri News : YCMHसह पालिकेच्या रुग्णालयातील आस्थापना, मानधन तत्वावरील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता; महासभेची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, महापालिका इतर रुग्णालये, दवाखाने या ठिकाणी कोरोनाच्या काळात आस्थापनेवर कार्यरत असलेल्या आणि मानधनावरील वैद्यकीय तांत्रिक संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांना कोविड भत्ता देण्यात येणार आहे. 1 ते 4 मधील 1 हजार 156 कर्मचा-यांना एप्रिल ते जून या तीन महिन्यांचा कोविड भत्ता देण्यासाठी 1 कोटी 4 लाख 35 हजार रुपये खर्च येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची जुलै महिन्याची तहकूब सभा आज (गुरुवारी) ऑनलाइन पार पडली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.

महापालिका हद्दीत दुसरी लाट मोठी आली होती. त्याचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेच्या आस्थापनेवरील वैद्यकीय कर्मचा-यांनी जिवाचे रान केले. जीव धोक्यात घालून काम केले. कोरोना काळात काम करणा-या वायसीएम रुग्णालयासह महापालिका रुग्णालय, दवाखान्यातील अधिकारी, कर्मचा-यांना स्वतंत्र कोविड भत्ता अदा करण्याबाबत वैद्यकीय मुख्य कार्यालयामार्फत 19 मे रोजी आयुक्तांकडे प्रस्ताव दिला होता.

त्यानुसार कोविड काळात कार्यरत असलेल्या तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, दंतशल्य चिकित्सक, स्टाफनर्स, सर्व पॅरामेडीकल स्टाफ, प्रयोगशाळा सहाय्यक, वर्ग 4 मधील कर्मचा-यांना वेतनाव्यतिरिक्त स्वतंत्र कोविड भत्ता देण्यास स्थायी समितीने 1 एप्रिल रोजी मान्यता दिली होती.

त्याचधर्तीवर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, महापालिकेची इतर रुग्णालये आणि दवाखाने या ठिकाणी कोरोनाच्या काळात आस्थापनेवर कार्यरत असलेल्या वैद्यकीय तांत्रिक संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांना कोविड भत्ता देण्यात येणार आहे. वर्ग 1 व 2 च्या कर्मचा-यांना 15 हजार रुपये, वर्ग 3 मधील कर्मचा-यांना 10 हजार आणि वर्ग 4 मधील कर्मचा-यांना 5 हजार रुपये भत्ता मिळणार आहे.

1 एप्रिल 2021 ते 30 जून 2021 या तीन महिन्याच्या कालावधीसाठी हा भत्ता देण्यात येणार आहे. वर्ग 1 चे 84, वर्ग 2 चे 88, वर्ग 3 चे 587 आणि वर्ग 4 चे 397 अशा 1 हजार 156 कर्मचा-यांना कोविड भत्ता देण्यात येणार आहे. त्यासाठी 1 कोटी 4 लाख 35 हजार रुपये खर्च येणार आहे.

मानधन तत्वावरील कर्मचा-यांनाही मिळणार कोविड भत्ता !

कोरोना काळात मानधनावर काम करणा-या वैद्यकीय अधिकारी 15 हजार रुपे., प्रजनन व बाल आरोग्य, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत मानधनावर कार्यरत असलेले शहर कार्यक्रम व्यवस्थापक, लेखा व्यवस्थापक, लेखापाल, लिपीक, एएनएम, डेटाएन्ट्री ऑपरेटर, स्टाफनर्स, वरिष्ठ डॉटस प्लस, क्षयरोग, एचआयव्ही पर्यवक्षेक, वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, प्रयोगशाळा पर्यवेक्षक, टि.बी हेल्थ व्हिजीटर, पीपीएम कॉर्डीनेटर, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बालवाडी शिक्षिका आणि आशा स्वयंसेविका यांना 10 हजार रुपये, मदतीनस, वाहनचालक यांना 5 हजार रुपये तीन महिन्यांसाठी कोविड भत्ता देण्यात येणार आहे.

त्याचबरोबर स्मशानभूमी कामगार, पीएमपीएमल कामगार, रुग्णवाहिका चालक, वायसीएम चाणक्य विभागातील सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांनाही तीन महिन्याचा कोरोना भत्ता देण्यास महासभेने उपसूचनेद्वारे मान्यता दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.