Pimpri News : शहरामध्ये कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करावे : संदीप वाघेरे

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे शहरामध्ये कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात यावे, अशी मागणी भाजपा नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

याबाबतीत अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले की,  शहरामध्ये आठवड्यामध्ये जवळपास 4000 पेक्षा जास्त रुग्णसंख्या आढळून आलेली आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने रूग्णांच्या उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यावर अधिक भर देणे तसेच रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेच्या वतीने शहरातील कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करणे गरजेचे झालेले आहे.

कोविड सेंटरमध्ये दाखल होणार्‍या रुग्णांना योग्य उपचार, तसेच रुग्णालयांना मुबलक औषध पुरवठा, अतिदक्षता विभागामध्ये लागणारी यंत्रसामुग्री, गॅस, इंजेक्शन, प्लाझ्मा इत्यादी गोष्टी उपलब्ध असणे अत्यंत जरुरीचे आहे.

याचबरोबर शहरामध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवणे, मास्कची कारवाई करणे, सुपर स्प्रेडर वेळीच शोधून काळजी घेणे, हॉटस्पॉट मध्ये कडक उपाययोजना करणे,लसीकरणाचा वेग वाढविणे  व त्यांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

शहरातील कोविड विषाणूची वाढती रुग्णासंख्या लक्षात घेऊन तत्काळ कोविड केअर सेंटर सुरू करून नियमांची कडक अमलबाजवणी करण्याचे निर्देश संबधित विभागास द्यावेत, अशी आग्रही मागणी वाघेरे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.