Pimpri News: सहआयुक्त, सहायक नगररचना पदांची निर्मिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत सहआयुक्त, सहायक संचालक नगररचना, मुख्य अभियंता, वरिष्ठ स्वीय सहायक, लघुलेखक पदांची निर्मिती करुन बढत्या देण्यास महासभेत उपसूचनांद्वारे ऐनवेळी मंजुरी देण्यात आली.

अग्निशामक, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा विभागाकरीता संरक्षण दलाप्रमाणे योग्य समन्वय साधणे आणि प्रभावी कामकाज होण्यासाठी एकच वरिष्ठ नियंत्रित अधिकारी म्हणून सहआयुक्त (आपत्ती सेवा) पद निर्मितीस मंजुरी देण्यात आली. तसेच, अणुविद्युत आणि दूरसंचार विभागात रिक्त असलेल्या सहशहर अभियंतापदी कार्यकारी कार्यकारी अभियंता थॉमस नरोन्हा यांची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली. वरिष्ठ स्वीय सहायक (गट अ) साठी 2 पदे आणि लघुलेखक (गट ब) साठी 3 पदे निर्मितीस मान्यता देण्यात आली.

महापालिकेचा सुधारित विकास आराखडा तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. नव्याने 11 गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे आहे. त्यामुळे वाढणारी लोकसंख्या आणि शहरीकरणाचा विचार करता ठाणे महापालिकेच्या धर्तीवर नगररचना आणि विकास विभागासाठी सहायक संचालक नगररचना विभागासाठी आणखी एक पद निर्मिती करण्यास मान्यता देण्यात आली. संदेश खडतरे यांची सहायक संचालक नगररचना म्हणून नियुक्तीस मान्यता देण्यात आली.

पुणे महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागामध्ये मुख्य अभियंता पदाची निर्मिती करुन सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात आली. प्रोजेक्टसाठी एक मुख्य अभियंता पद तयार करण्यात आले आहे. त्यांच्याकडे मुख्य रस्ते बीआरटीएस, पूल आणि प्रकल्प, वाहतूक नियोजन इमारती प्रकल्प आदी कामे असणार आहे. पर्यावरण विभागासाठी एक मुख्य अभियंता पद तयार करण्यात आले. त्यामध्ये पर्यावरण अभियांत्रिकी विभागातील पदवी किंवा तत्सम अर्हता धारक आणि सेवा ज्येष्ठ सहशहर अभियंतांमधून बढतीने पदभरती करण्यात येणार आहे. सहशहर अभियंता (पर्यावरण) या पदावरील किमान 2 वर्षांचा अनुभव असणाऱ्यांची या पदावर वर्णी लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.