Pimpri news: अवैध धंद्याला आळा घाला, गुन्हेगाराच्या पोशिंद्यांवर चाप बसवा – श्रीरंग बारणे

शिवसेना शिष्टमंडळाने घेतली नवनियुक्त पोलीस आयुक्तांची भेट

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध धंदे बंद करावेत. कायदा आणि सुव्यवस्था चांगली राखण्यासाठी अगोदर अवैध धंद्याला आळा घालावा. व्हाईट कॉलर वाल्यांना सोडणार नाही ही भूमिका चांगली आहे.  परंतू, केवळ गुन्हेगारांच्या पाठीमागे लागू नका, गुन्हेगाराच्या पोशिंद्यावर चाप बसवा, अशी सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पोलीस आयुक्तांना केली आहे. पोलीस ठाण्यातून संगनमताने गुन्हे घडविले जातात.  गुन्हेगाराला सपोर्ट करणाऱ्यांवरही  नजर ठेवण्यात यावी, असेही ते म्हणाले.

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवडचे नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची पोलीस आयुक्त कार्यालयात आज (शनिवारी)   सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी शहरातील कायदा व सुरक्षा याबाबत चर्चा केली. खासदार बारणे यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहर प्रमुख योगेश बाबर शहर, महिला संघटिका उर्मिला काळभोर उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, गुन्हेगारीचा बिमोड गुन्हेगारापुरता मर्यादित नसून गुन्हेगाराला पाठिंबा देणारा आणि गुन्हेगार पोसणारा दोघांवर कारवाई झाली पाहिजे.

शहरातील अवैध धंदे बंद करावेत. कायदा आणि सुव्यवस्था चांगली राखणार असे आपण सांगितले आहे. त्यासाठी अगोदर अवैध धंद्याला आळा घालावा. पोलीस ठाण्यातून संगनमताने गुन्हे घडविले जातात. कोण गुन्हेगाराला सपोर्ट करतो, अशांवर देखील नजर ठेवण्यात यावी.

व्हाईट कॉलर वाल्यांना  सोडणार नाही असे आपण म्हणालात. परंतू, केवळ गुन्हेगारांच्या पाठीमागे लागू नका, गुन्हेगाराच्या पोशिंद्यावर चाप बसवा, असेही खासदार बारणे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.