Pimpri News: विद्यमान नगरसेवक संपर्कात, योग्यवेळी प्रवेश; भाजपचा दावा

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीत प्रवेश केलेले भाजप नगरसेविका माया बारणे यांचे पती, माजी नगरसेवक संतोष बारणे यांचे बंधु नारायण बारणे, पुतणे रोहित बारणे यांच्यासह वाकड, थेरगाव भागातील कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज (शुक्रवारी) भाजपमध्ये प्रवेश केला. काही विद्यमान नगरसेवक भाजपामध्ये प्रवेशासाठी संपर्कात आहेत. त्यांचा सुध्दा भाजपामध्ये योग्य वेळ पाहून प्रवेश होणार असल्याचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.

महापालिका आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्यासाठी शहरातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते इच्छुक आहेत. वाकड मधील युवा कार्यकर्ते विक्रम कलाटे, अभिजीत गायकवाड यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी पिंपरी विधानसभेचे प्रभारी सदाशिव खाडे, नगरसेवक विलास मडिगेरी, भाजपाचे प्रदेश चिटणीस अमित गोरखे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, गणेश गुजर आदी उपस्थित होते. या प्रवेशासाठी चिंचवड विधानसभेचे प्रभारी संतोष कलाटे व विशाल कलाटे यांनी पुढाकार घेतला.

महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक 2022 मध्ये होत आहे. त्यानुषंगाने त्यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये झालेला प्रवेश वाकड आणि थेरगाव भागात भाजपासाठी फायदेशीर ठरणारा आहे. याशिवाय येणाऱ्या काळात अजूनही बरेच कार्यकर्ते, काही विद्यमान नगरसेवक भाजपामध्ये प्रवेशासाठी संपर्कात आहेत. यांचा सुध्दा भाजपामध्ये योग्य वेळ पाहुन प्रवेश होणार आहे. त्यामुळे “आगे आगे देखो, होता है क्या” अशी प्रतिक्रिया सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.