Pimpri News: ‘डेडलाइन’ संपली! पर्यावरण अहवाल महासभेसमोर कधी येणार?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पर्यावरण अहवाल दरवर्षी 31 जुलैपर्यंत सादर करणे बंधनकारक असताना अद्यापही यंदाचा अहवाल महासभेसमोर सादर करण्यात आला नाही. जुलै संपला तरी अहवाल तयार नाही. त्यामुळे प्रशासन अहवालाबाबत गंभीर नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शहरातील विविध भागातील हवा, ध्वनी, जल प्रदूषणाची शास्त्रीयदृष्ट्या चाचणी करून नागरिकांना प्रदूषणमुक्त जीवन जगण्यासाठी वातावरण तयार करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाने सर्वच महापालिकांना 31 जुलैपूर्वी पर्यावरण सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे बंधन घातले आहे. महापालिका क्षेत्राचा विकास साधताना पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक असते. पालिकेच्या मूलभूत व पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, घनकचरा, प्राणी व वनसंपदा, विरंगुळ्याची साधने, हवा, पाणी, ध्वनीप्रदूषण आदीचा अभ्यास करून पर्यावरण अहवाल तयार केला जातो. त्यातून लोकजागृती हा एक उद्देश आहे.

शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याचा उहापोह झाल्यास काही बाबींवर नियंत्रण आणता येते. पर्यावरणातील विविध घटकांचा अभ्यास आणि त्याचे प्रमाणबद्ध मूल्यांकन करून दरवर्षी पर्यावरण सद्यस्थिती अहवाल सादर केला जातो. तो 31 जुलैअखेर प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. परंतु, पिंपरी महापालिकेने अद्याप अहवाल सादर केला नाही.

”कोरोनामुळे विलंब झाला. पर्यावरण अहवालाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दरवर्षी जुलै किंवा ऑगस्ट महिन्याच्या सभेत सादर केला जातो. 20 तारखेच्या महासभेत अहवाल सादर केला जाईल”, असे पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.