Pimpri News: अजितदादांकडून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन करणारे ट्वीट डिलीट; उलटसुलट चर्चेला उधाण

एमपीसी न्यूज – भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणारे ट्वीट उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले होते. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. पण, काही वेळानंतर अजितदादांनी ते ट्वीट डिलीट केले. ट्वीट नेमके डिलीट का केले, याची चर्चा रंगली आहे.

भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज (शुक्रवारी) जयंती आहे. त्यानिमित्त भाजपच्या नेत्यांकडून त्यांना अभिवादन केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील उपाध्याय यांना ट्वीटरद्वारे अभिवादन केले होते.

_MPC_DIR_MPU_II

भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक, ज्येष्ठ नेते स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! असे अजित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटले होते. मात्र काही तासांनंतर अजित पवारांकडून हे ट्वीट डिलीट करण्यात आले आहे. त्यामुळे अजितदादांनी दीनदयाळ यांना अभिवादन करणारे ट्वीट डिलीट का केले? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

दरम्यान, अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे शपथ घेऊन सरकार स्थापन केले होते. तेव्हापासून अजित पवार भाजपशी सलगी राखून असल्याचे बोलले जात होते. त्यातच त्यांचे पुत्र पार्थ यांच्याकडून वेळोवेळी भाजपला अनुकूल अशी घेतली जाणारी भूमिका, त्यामुळे पवार पिता-पुत्रांच्या मनात नेमके काय चालले आहे. असे प्रश्न उपस्थित केले जात होते.

त्यातच आता अजित पवार यांनी भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणारे ट्वीट करणे आणि त्यांनतर काही वेळाने ते डिलीट केले. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या असून चर्चेला उधाण आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.