Pimpri News : माहिती अधिकारातील अर्जाला ‘केराची टोपली’ दाखविणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज – माहिती अधिकार कायद्यानुसार (Pimpri News) मागवलेली माहिती मुदत संपूनही न देणाऱ्या तसेच अर्जदाराशी उद्धट वर्तणूक करणाऱ्या जन माहिती अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी, तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली आहे.

पंकज राऊत असे संबंधित जन माहिती अधिकाऱ्याचे नाव असून ते पिंपरीच्या संत तुकारामनगर येथील सहकारी संस्था (पुणे शहर 3) उपनिबंधक कार्यालयात कार्यरत आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी या संदर्भात जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबळे यांच्याशी संपर्क साधून तक्रार केली आहे. मुदतीत माहिती देणाऱ्या अधिकाऱ्याला पाठीशी घालणारे उपनिबंधक नागनाथ कंजेरी यांच्यावर देखील कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

उपनिबंधक सहकार संस्था पुणे शहर तीन संत तुकाराम नगर पिंपरी पुणे येथे माहिती अधिकार कार्यकर्ता प्रदीप नाईक यांनी एका सोसायटीची माहिती मागवली होती. या संदर्भात त्यांनी 26 डिसेंबर 2022 या दिवशी त्यांच्या कार्यालयामध्ये माहिती अधिकारानुसार लेखी अर्ज करण्यात आला होता. त्यामध्ये त्या सोसायटीचे काही ऑडिट ची माहिती तसेच वार्षिक सभा याची माहिती मागविण्यात आली होती तसेच सोसायटीमध्ये आत्तापर्यंत झालेल्या सभेची व त्या सभेमध्ये कोणते विषय मांडले होते याची माहिती मागविण्यात आली होती.

माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार ही माहिती मागविण्यात (Pimpri News) आली होती. त्यामुळे 30 दिवसाच्या आत ही माहिती उपलब्ध करून देणे कायद्याने बंधनकारक आहे, मात्र जन माहिती अधिकारी पंकज राऊत यांनी माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली दाखवली, असा आरोप नाईक यांनी केला आहे.

माहिती न दिल्याबद्दल जाब विचारला असता संबंधित अधिकाऱ्याने प्रदीप नाईक यांना उद्धट उत्तर दिले. आम्ही माहिती देत नाही, तुम्ही अपिलात जा, असे त्यांनी नाईक यांना सुनावले. सरकारी अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत. कायद्याने बंधनकारक असलेली माहिती न देता, उलट अर्जदाराशी उद्धट वर्तणूक करण्यापर्यंत मजल गाठणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्याचे निलंबन करावे, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.

माहिती अधिकार पायदळी तुडविणाऱ्या कार्यालयाचे प्रमुख या नात्याने उपनिबंधक नागनाथ कंजेरी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असेही नाईक यांनी म्हटले आहे.

संबंधित कार्यालयातील फलकावर अपिलीय अधिकाऱ्याचे नावही लिहिले नसल्याबद्दल नाईक यांनी आश्चर्य व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.