Pimpri News: पालिका आयुक्तांच्या नावाने नगरसेवकांकडे आर्थिक मदतीची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या नावाचे बनावट व्हाट्स अप अकाउंट बनवून अनोळखी व्यक्तींनी नगरसेवकांकडे आर्थिक मदतीची मागणी केली. हा प्रकार 17 जानेवारी 2022 ते 18 जानेवारी 2022 या कालावधीत पिंपरी चिंचवड महापालिका भवन येथे घडला.

याप्रकरणी नीलकंठ धोंडीराम पोमण (वय 54, रा. चिंचवड) यांनी शनिवारी (दि. 22) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 7524891151, 7977510080 या क्रमांकावरून संपर्क करणा-या अज्ञात इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी आरोपींनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश प्रभाकर पाटील यांच्या व्हाट्स प्रोफाइलचा फोटो वापरून खोटे व्हाट्सअप प्रोफाइल बनवले. त्याद्वारे संतोष जाधव यांच्याशी आरोपींनी चॅटिंग केले. नगरसेवक अजित गव्हाणे, अंबरनाथ कांबळे, लक्ष्मण सस्ते यांना आरोपींनी व्हाट्स अप कॉल केला. त्यावर पालिका आयुक्तांचा हुबेहूब आवाज काढून ऍमेझॉन गिफ्ट कार्डद्वारे आर्थिक मदतीची मागणी केली. सायबर सेलचे पोलीस निरीक्षक संजय तुंगार तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.