Pimpri News : नदीकाठच्या आपत्तीजनक ठिकाणी ‘फ्लड सेन्सर्स’ बसविण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना आणि इंद्रायणी नदीकाठच्या परिसरात पावसाळ्यातील अतिवृष्टीचा धोका लक्षात घेवून ‘फ्लड सेन्सर्स’ बसवण्यात यावेत. तसेच, मोठ्या प्रमाणात पाणी साचणाऱ्या शक्य त्या ठिकाणी ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवावेत, अशी मागणी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पवना धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यानंतर धरणातून विसर्ग केला जातो. त्यामुळे पवना नदीकाठच्या गावांमध्ये पुरसदृष्य परिस्थिती निर्माण होत असते. सध्या पावसाळा सुरू आहे. शहरातील रावेत, किवळे, चिंचवड, पिंपरी, पिंपळेनिलखसह नदीकाठच्या भागात पाणी घुसण्याचा धोका आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने आपत्ती निवारण कक्ष सुरू केला आहे.

परंतु, रात्री-अपरात्री पाणी वाढल्यास काय करावे ?, अशी भिती नागरिकांमध्ये आहे. इंद्रायणी नदीकाठच्या लोकवस्तीमध्येही तिच अवस्था आहे. यावर्षी पहिल्याच पावसात पवना नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झाली होती. धरणातून विसर्ग केला नव्हता, तरीही पुरस्थिती निर्माण झाली होती.

सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. पण, यावर्षी पहिल्याच पावसात चिंचवड गावातील मोरया गोसावी मंदिरात पाणी शिरले. मंदिराचा काही भाग पाण्यात बुडाला होता, याबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरात पाणी साचणाऱ्या शक्य त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करावेत. त्या कॅमेऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी जोडले जावे.

तसेच, नदीकाठच्या भागात ‘फ्लड सेन्सर्स’ बसवण्यात यावेत. त्याद्वारे आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी यांना सतर्क राहता येईल.

पर्जन्यवृष्टी वाढल्यास दर दोन तासांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि ‘फ्लड सेन्सर्स’द्वारे संपूर्ण यंत्रणा सतर्क करता येईल. याबाबत महापालिका प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी मोढवे-पाटील यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.