Pimpri News : नगरसेविका बारणे यांच्या मृत्यूप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – थेरगाव येथील नगरसेविका अर्चना बारणे यांचा 13 जुलै 2021 रोजी मृत्यू झाला. ज्या खासगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला त्या रुग्णालयातून बारणे यांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांचा डेंग्युमुळे मृत्यू झाला नसल्याचे महापालिकेचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.

त्यामुळे या प्रकरणात संबंधितांची उच्च स्तरीय समिती नेमून चौकशी करावी, अशी मागणी ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनकडून पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

हयुमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कठारे, उपाध्यक्ष प्रमोद केसरकर, राष्ट्रीय कोषाध्यक्ष रामराव नवधन, राष्ट्रीय निरीक्षक रामदास खोत, निरीक्षक महाराष्ट्र राज्य दिलीप टेकाळे, संघटक महाराष्ट्र राज्य मुनीर शेख, संपर्क प्रमुख पश्चिम महाराष्ट्र राज्य अविनाश रानवडे,

उपाध्यक्ष पुणे जिल्हा अशोक बाबळे, सेक्रेटरी पुणे जिल्हा डॉ. सतिश नगरकर, अध्यक्ष पिंपरी-चिंचवड अॅड. विजय मैड, उपाध्यक्ष पिंपरी-चिंचवड शहर बाबासाहेब गायकवाड, निरीक्षक पिंपरी-चिंचवड अशोक गजभार, कायदे सल्लागार पिंपरी-चिंचवड शहर सुप्रिया मलशेटटी यांनी मागणीचे निवेदन आयुक्तांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, थेरगाव येथील नगरसेविका अर्चना तानाजी बारणे यांचा मृत्यू डेंग्युने झालेला आहे. महापालिकेचे अतिरिक्त वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे यांनी वायसीएम येथील शासनमान्य सेंटिनल सेंटर येथे डेंग्यू निदानासाठी रक्तजल नमुना तपासणीसाठी पाठवला असता तो निगेटीव्ह आला. या नगरसेविकेचा मृत्यू डेंग्युने झालेला नाही, असे डॉ. साळवे यांनी सांगितले.

त्यांचा रक्तगट ‘ए पॉझिटीव्ह’ असताना बाणेर येथील एका हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचार सुरू असताना येथील डॉक्टरांनी त्यांना ‘बी निगेटीव्ह’ प्लेटलेटस देण्यात आल्याचे समजते. डेंग्युने त्यांचा मृत्यू झाला नसताना डेंग्युचा खोटा रिपोर्ट का देण्यात आला. नगरसेविका बारणे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे.

त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यासाठी पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, महापौर यांनी त्वरीत उच्चस्तरीय चौकशी नेमून मृत्यूचे कारण शोधावे. नगरसेविका बारणे यांच्या मृत्यूस कारणीभूत असणा-या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

शहरातील लोकप्रतिनिधीचा अशा प्रकारे मृत्यू होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील, असा प्रश्न येथील नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. परंतु, खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे व चुकीच्या औषधोपचारामुळे कित्येक गोरगरीबांचे मृत्यू होत आहेत.

याची गंभीर दखल पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टर जर पेशंटवर चुकीचे औषधोपचार वापरून उपचार करत असतील तर अशा हॉस्पिटलवर कठोर कायदेशीर कार्यवाही करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.