Pimpri News : गुंडाना सरंक्षण देणाऱ्या राजकीय मंडळीवरच कारवाईची पोलीस आयुक्तांकडे मागणी

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी व त्यास पाठबळ देणाऱ्या राजकीय मंडळींवरच आता पोलीस खात्याने आसूड हाती घ्यावा, असे साकडे मराठा सेवा संघाच्या वतीने आज पोलीस आयुक्तांना घालण्यात आले.

शहरातील वाढत्या वाहन तोडफोडीच्या घटना तसेच गुंडाचे अड्डे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल लक्ष वेधण्यासाठी मराठा सेवा संघाच्या उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव आणि  मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आणि जिजाऊ ज्येष्ठ नागरिक संघटना यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची भेट घेऊन त्यांना यासंबंधीचे निवेदन दिले.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शहरासाठी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती काही प्रमाणात सुधारित असल्याबद्दल मराठा सेवा संघाने त्यांचे अभिनंदन केले. मात्र, अजूनही शहरात सराईत गुन्हेगारांच्या साखळ्या आपल्या कारवाया करतच असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

आजही पोलीस चौक्यांमध्ये गुन्हेगार तसेच संघटीत गुन्हेगार यांच्या विरुद्ध तक्रार देण्यास गेलेल्या नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. महिला व मुलींची छेडछाड तक्रार असो की, किरकोळ वाद या कडे पोलीस गुन्हा दाखल करण्याचे टाळत आहेत.

शहरात 65 पेक्षा अधिक झोपडपट्टया असून स्थानिक राजकीय मंडळी निवडणूकांत या गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचे वारंवार उघड व सिद्ध झाले आहे व आपल्याच खात्यातील अधिकाऱ्यांवर आपण केलेल्या कारवाईमुळे ते सिद्धही झाल्याचे मराठा सेवा संघाने म्हटले आहे.

या वेळी संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष प्रविण कदम, जिजाऊ ब्रिगेडच्या शहर अध्यक्ष स्मिता म्हसकर, पुणे जिल्हा अध्यक्ष संगिता निकम, मराठा सेवा संघाच्या उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव, संघाचे महासचिव सचिन दाभाडे, जिजाऊ ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अशोक सातपुते व मोहन जगताप, उपाध्यक्ष माणिक शिंदे आदी यावेळी उपास्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.