Pimpri News: परवागीशिवाय 81 दिवस गैरहजर राहणाऱ्या लिपिकाची खातेनिहाय चौकशी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयातील लिपिक तब्बल 81 दिवसांहून अधिक दिवस विनापरवाना गैरहजर राहिल्याने त्याची खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

चांगदेव सोपानराव खुने, असे खातेनिहाय चौकशी सुरु झालेल्या लिपिकाचे नाव आहे. खुने हे गट क मधील लिपिक या जबाबदारीच्या पदावर कार्यरत आहेत.

त्यांच्याकडे ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाकडील विवाह नोंदणी, वाहन, इंधन बिले, स्थायी अग्रीम, ध्वजनिधी, माहिती अधिकार, अभिलेक कक्ष हे कामकाज सोपविण्यात आले आहे. त्यामुळे खुने यांनी कर्तव्यावर पूर्णवेळ हजर राहून नेमून दिलेले कामकाज अत्यंत सचोटीने व जबाबदारीने पूर्ण करणे हे त्यांचे कार्यालयीन कर्तव्य आहे. असे असताना त्यांनी वारंवार विनापरवाना, विनासूचना गैरहजर राहून कार्यालयीन कामकाजामध्ये अडथळा निर्माण केल्याची बाब ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाने निदर्शनास आणून दिली.

ऑक्टोबर 2020 ते जानेवारी 2021 अखेर 81 दिवस व त्यानंतर आजअखेरपर्यंत खुने विनापरवाना गैरहजर आहेत. याप्रकरणी ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाने त्यांना वेळोवेळी कारणे दाखवा नोटीस देवून दंडात्मक कारवाई केली.

सक्त ताकीद देवूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. गैरहजेरीत वाढ होत असल्याने त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची शिफारस करण्यात आली. त्यानुसार आयुक्त पाटील यांनी खुने यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत. या आदेशाची त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.