Pimpri News: घरेलू कामगारांसाठी लाभदायी योजना राबविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन; कामगार नेते काशिनाथ नखाते यांची माहिती

एमपीसी न्यूज – “संत जनाबाई सामाजिक सुरक्षा योजनेतून घरेलू कामगारांना विविध लाभ देण्याची मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली. त्यावर घरेलू कामगारांसाठी लवकरच लाभदायी योजना सुरू करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे नखाते यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आज पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. घरेलू कामगारांच्या विविध प्रश्नावर चर्चा केली. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, राष्ट्रवादी कामगार सेल उपाध्यक्ष योगेश जाधव, चंद्रकांत कुंभार, उपाध्यक्ष राजेश माने, इरफान चौधरी आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यातील घरेलू कामगार कोरोना व विविध प्रश्नांमुळे संकटात आहेत. महामंडळात निधी नसल्याने ते कार्यान्वित नव्हते अशा स्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारातून सन 2021-22 च्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात कष्टकरी घरेलू काम करणाऱ्या महिलांसाठी “संत जनाबाई सामाजिक सुरक्षा योजना”जाहिर करुन 250 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली. या निधीतून विविध लाभ देण्यात यावेत अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यानी केली. यावेळी घरेलू कामगार प्रश्नी मी आणी कामगार मंत्री यांनी लक्ष घातले आहे. त्यांना लाभदायी योजना लवकरच सुरू करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे नखाते यांनी सांगितले.

नखाते म्हणाले, कोरोना कालावधीत घरेलू कामगारांचे प्रचंड हाल झाले. त्याचबरोबर नोंदणी नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. अशातच अर्थसंकल्पात ही तरतूद केल्यामुळे सर्वसामान्य कामगारांना लाभदायी ठरणार आहे. वास्तविक सन 2009 मध्ये आघाडी सरकार असताना या कायद्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने झाली. यानंतर मात्र सन 2014 पासून या कायद्याला वारंवार टाळण्यात आले. त्याची अंमलबजावणी होत नव्हती. मात्र पुन्हा महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारातून हे महामंडळ पुन्हा पुनर्जीवित होणार आहे. याबद्दल घरेलू कामगारांत समाधान होत आहे.

अजितदादांच्या पुढाकारातून महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य घरेलू कामगारांना कोरोनाच्या भयानक परिस्थितीत सन 2019 पर्यंत ज्या महिलांची नोंदणी झाली. अशा घरेलू कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपये दिले. याचा लाभ राज्यातील अनेक महिलांना झाला, मात्र आजही महाराष्ट्रात अनेक महिलांची नोंदणी नसल्यामुळे त्यांना विविध योजनांपासून वंचित राहावे लागते. यासाठी नोंदणी सुकर करण्यात यावी. त्यानां न्याय देण्यासाठी व सामाजिक सुरक्षा लागू करण्यासाठी आपण महाराष्ट्रातील घरेलू कामगार संघटना व कामगार विभगाची बैठक घेऊन नियोजण करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. कष्टकरी महिलांसाठी विविध योजनांचे नियोजन करून त्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा आपण प्रयत्न करू असे पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.