Pimpri News: ‘कोरोनाच्या नव्या विषाणूला रोखण्यासाठी उपयोजना करा; औषधे, ऑक्सिजनचा साठा मुबलक ठेवा’

उपमहापौर हिराबाई घुले यांची आयुक्तांना सूचना

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने निर्बंध शिथिल केल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत असताना आता कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पिंपरी-चिंचवड शहरातील अनेकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये युवकांची संख्या अधिक होती. दुसऱ्या लाटेत शहराची मोठी हानी झाली. त्यामुळे कोरोनाच्या नव्या विषाणूला रोखण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना सुरू कराव्यात.

औषधे, ऑक्सिजनचा साठा मुबलक ठेवावा. अनेकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला नाही. त्यांचे घरोघरी जाऊन लसीकरण पूर्ण करावे, अशा सूचना उपमहापौर हिराबाई घुले यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात उपमहापौर घुले यांनी म्हटले आहे की, शहरातील रुग्णसंख्या शंभरच्या आत आली होती. सर्व निर्बंध शिथिल झाले होते. सर्व व्यवहार सुरळीत झाले. रुग्णसंख्या घटल्याने आनंदाचे वातावरण होते. नागरिकांनीही मास्क घालणे, सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर कमी केला होता. प्रशासनही ‘रिलॅक्स’ झाले होते. पण, कोरोनाचा नवीन विषाणू आला आहे. कोरोनाच्या या नव्या विषाणूने दक्षिण आफ्रिकेतील यापूर्वीच्या डेल्टा व्हेरिएंट प्रकाराची जागा घेतली असून त्याचा संसर्ग कितीतरी अधिक आहे असे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. या विषाणूची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्हणून काळजी घ्यावी. दक्ष रहावे. आत्तापासूनच उपाययोजना हाती घ्याव्यात.

दुसऱ्या लाटेत शहरातील युवकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त होते. घरातील कर्ता पुरुष गेल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आली. दुसऱ्या लाटेने मोठे नुकसान झाले. कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेचा महापालिका प्रशासनाला अनुभव आहे. दुसऱ्या लाटेत आपण कुठे कमी पडलो. याचा अभ्यास करावा. त्यानुसार सुविधांमध्ये वाढ करावी. औषधांची उपलब्धता वाढवावी. ऑक्सिजनचा साठा मुबलक ठेवावा. कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने नागरिक गाफील झाले होते. त्यामुळे मास्क घालणे,वारंवार हात धुणे याबाबत व्यापक जनजागृती करावी. विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करावी. शहरातील 25 लाख नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. पण, त्यातील अनेकांचा दुसरा डोस झाला नाही. दुसरा डोस बाकी असलेल्या नागरिकांना शोधून त्यांचे लसीकरण तातडीने पूर्ण करावे, अशी सूचना उपमहापौर घुले यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.