Pimpri News: उपमहापौर केशव घोळवे यांचा राजीनामा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचे उपमहापौर केशव घोळवे यांनी अवघ्या चार महिन्यात राजीनामा दिला आहे. घोळवे यांनी महापौर उषा ढोरे यांच्याकडे आज (शुक्रवारी) उपमहापौर पदाचा राजीनामा दिला असून महापौरांनी तो मंजूर करत आयुक्तांकडे पाठविला आहे. दरम्यान, उपमहापौरपदासाठी वसंत बोराटे यांचे नाव निश्चित असल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.

सत्ताधारी भाजपने 14 ऑक्टोबर 2020 रोजी तुषार हिंगे यांचा तडकाफडकी उपमहापौरपदाचा राजीनामा घेतला होता. त्यांच्याजागी मोरवाडीचेच प्रतिनिधीत्व करणारे केशव घोळवे यांची 6 नोव्हेंबर 2020 रोजी उपमहापौरपदी निवड झाली होती.

त्यांना केवळ चार महिन्यांचा कार्यकाळ देण्याचे पक्षांतर्गत ठरले होते. उद्या ( शनिवारी ) त्यांचे चार महिने पूर्ण होतात. पक्षाने दिलेली मुदत संपल्याने घोळवे यांनी आज उपमहापौरपदाचा राजीनामा दिला आहे.

केशव घोळवे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला आहे. तो राजीनामा मी मंजूर केला असून आयुक्तांकडे पाठविला असल्याचे महापौर उषा ढोरे यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

वसंत बोराटे नवीन उपमहापौर ?

मागील चार वर्षात एकही पद न मिळाल्याने नाराज असलेल्या वसंत बोराटे यांना मागीलवेळीच उपमहापौरपद दिले जाणार होते. परंतु, त्यांची संधी हुकली होती. पुढील सहा महिन्यात बोराटे यांना उपमहापौरपद देण्याचे ठरले होते. त्यामुळे उपमहापौरपदी बोराटे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.